मामीमुळे बहिणीची सोयरिक तुटली; बहिणीचे लग्न लांबल्यामुळे त्याचे लग्न होईना; म्हणून अन्सारने काटा काढला; मामीच्या मुलाचा खून केला!
अंबाशीच्या अरहान मर्डर प्रकरणात धक्कादायक खुलासा...
Jul 25, 2024, 13:44 IST
चिखली(ऋषी भोपळे:लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील अंबाशी येथील अरहान शेख या १० वर्षीय चिमुकल्याचे किडनॅपिंग करून त्याचा खून केल्याची घटना २३ जुलै रोजी उघडकीस आली होती. २२ जुलैच्या सकाळी ९ वाजेपासून अरहान बेपत्ता होता.त्यामुळे त्याच्या अपहरणाची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी अरहानचा अतिशय निर्दयतेने खून केल्याचे समोर आले. अरहानचा सख्खा आतेभाऊ अन्सार शेख याने अरहानचा गळा आवळून खून केला, त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेणाच्या उकिरड्यात पुरून टाकल्याचे उघडकीस आले. दरम्यान आता या खून प्रकरणाचे धक्कादायक कारण समोर आले आहे. सोयरीकीच्या वादातून अन्सारने अरहानचा खून केला असल्याचे समोर आले आहे.
आरोपी अन्सारने पोलिसांना अरहानच्या खुनाचे कारण सांगितले. आरोपी अन्सारच्या बहिणीचे लग्न व्हायचे आहे. त्यासाठी ८ महिन्याआधी एक स्थळ आले होते. मात्र काही कारणास्तव ही सोयरिक जुळून आली नाही. मामीमुळेच सोयरिक तुटल्याचा राग अन्सारच्या मनात होता. बहिणीचे लग्न होत नसल्याने अन्सारचेही लग्न होत नव्हते. त्यामुळे अन्सारची चीड चीड होत होती. मामीचाच काटा काढायचा त्याचा प्लॅन होता मात्र ते त्याला जमले नाही.
त्यामुळे अरहानचा खून करण्याची योजना आरोपी अन्सारने बनवली. अरहान हा नेहमी त्याच्या वडिलांसोबत रहायचा, त्यामुळे एकटे पाहून संधी साधायची असे अन्सारने ठरवले. २२ जुलैला अरहान एकटा असल्याचे पाहून आसुरी वृत्तीच्या अरहानने डाव साधला. दोरीने गळा आवळून अरहानचा खून केला आणि मृतदेह पोत्यात टाकून उकिरड्यात पुरला.