शेतकऱ्यांना साडेपाच कोटींचा चुना लावणाऱ्या जग्गू डॉनच्या मलकापूर पोलिसांनी मध्य प्रदेशातून आवळल्या मुसक्या! ६ हजार क्विंटल कापूस खरेदी करून पैसे न देताच झाला होता फरार..

 
Crime
मलकापूर(अक्षय थिगळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कापूस खरेदी करून कोट्यवधी रुपयांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या जग्गू डॉन ऊर्फ जगन रामचंद्र नारखेडे याला अखेर पोलिसांनी हुडकून काढले. मध्य प्रदेशातून एका साथीदारासह जग्गूला शहर पोलिसांनी अटक केली. आरोपींविरुद्ध सुमारे ६० शेतकऱ्यांनी फसवणुकीच्या तक्रारी दिल्या आहेत. ६ हजार क्विंटल कापूस खरेदी करून आरोपी जग्गू डॉनने तब्बल ५ कोटी ४० लाखांनी शेतकऱ्यांची लूट केली आहे.
पोलिसांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. असंख्य शेतकऱ्यांची फसवणूक करूनदेखील आरोपीविरुद्ध तक्रार द्यायला सुरुवातीला शेतकरी पुढाकार घेत नव्हते. दरम्यान, ३० नोव्हेंबर रोजी कुंड येथील अतुल मधुकर पाटील यांनी तक्रार नोंदवली. त्यांचा १५३ क्विंटल कापूस भालेगावचा जगन रामचंद्र नारखेडे व शरद विष्णू बोरले तसेच राजेश पुंडलिक पाटील (कुंड) खरेदी केला. तसेच अन्य शेतकऱ्यांचाही कापूस खरेदी करण्यात आला. २२ लाख २४ हजार ७१० रुपयांचा कापूस घेतल्यानंतर आरोपी पसार झाले. याप्रकरणी भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यातील आरोपी राजेश पांडुरंग पाटील व शरद विष्णू बोरले यांना १ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. यातील मुख्य आरोपी जगन नारखेडे याचा शोध घेण्यात येत होता.
पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, डीवायएसपी देवराम गवळी, पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे, पोलीस शिपाई संतोष पेंढारकर व गोपाल तारुळकर तपास करत होते. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता सायबर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई संतोष पेंढारकर यांनी पत्रव्यवहार केला. १९ डिसेंबरला आरोपी दडून बसलेले ठिकाण सापडले.
पीएसआय सुरेश रोकडे, पोलीस शिपाई गोपाल तारुळकर, संतोष पेंढारकर, नासीर शेख, नवल राठोड, ईश्वर वाघ यांच्या पथकाने मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यामधील मुसामुंडी (ता. बजाक) येथून आरोपीस उचलले. त्याचवेळी त्याचा सहकारी आरोपी पृथ्वीराज तायडे (भालेगाव) हादेखील मिळून आला. आरोपींना रात्री उशीरा गोरखपूर (मध्य प्रदेश) येथून मलकापूरला आणले. २८ डिसेंबरपर्यंत पीसीआर
आरोपींकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.