अल्पवयीन मुलीला प्रेग्नंट केले...तिने बदनामीच्या भीतीने रेल्वेखाली झोकून दिले!

शेगाव तालुक्‍यातील धक्कादायक घटना
 
File Photo
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रेग्नंट असलेल्या १७ वर्षीय मुलीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना १५ डिसेंबरला पहाटे मोरगाव डिग्रस (ता. शेगाव) शिवारातील रेल्वेलाईनवर घडली. तिला प्रेग्नंट करणारा आणि आत्‍महत्‍येस प्रवृत्त करणारा कोण, याचा शोध जलंब पोलीस घेत असताना पीडित मुलीच्या वडिलांनी आज, १७ डिसेंबरला सायंकाळी एका तरुणावर संशय व्यक्‍त केला आहे.
शेगाव तालुक्‍यातील एका गावातील १७ वर्षीय मुलीसोबत शरीरसंबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. त्यामुळे बदनामीच्या भीतीपोटी तिने आत्महत्या केली. तिच्याशी शरीरसंबंध ठेवून प्रेग्‍नंट करणारा व आत्‍महत्‍येस कारणीभूत ठरलेला "हाच' २२ वर्षीय तरुण आहे, असे मुलीच्या ४५ वर्षीय वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍याचे नाव समोर येताच पोलिसांनी त्‍याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र तोच कारणीभूत असल्याबद्दल शंका असल्याने त्‍याचे नाव पोलिसांनी जाहीर केलेले नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरिक्षक श्री. बांडे करत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तपासाच्या सूचना केल्या आहेत.