इंस्टाग्रामवरून झाले प्रेम; नंतर रंगवले लग्नाचे स्वप्न; पण प्रेमवीर निघाला भलताच सायको; तिच्या कुटुंबीयांना म्हणे लग्न करू न दिल्यास "तसले" फोटो व्हायरल करतो;

बुलडाणा सायबर पोलिसांनी आरोपीला नंदुरबार वरून आणले उचलून; खामगावची आहे पीडित तरुणी! 

 
hkjlsjlsdlksdlksd

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):हल्ली सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोशल मीडिया वापरण्याबाबतचे अज्ञान त्याला कारणीभूत आहे. सोशल मीडियावर आपले फॉलोअर, फ्रेंड जास्त दिसावेत म्हणून  कधीच न पाहिलेल्या अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट देखील स्विकारल्या जातात..काही महाभाग तर न पाहिलेल्या लोकांच्या थेट प्रेमात देखील पडतात..मात्र त्यानंतर त्यांच्यासोबत जे घडत ते धक्कादायक असतं..धड सांगताही येत नाही अन् काही करताही येत नाही अशी अवस्था अशांची होते..मात्र असा काही प्रकार घडला तर सायबर पोलिसांकडे तक्रार देणे कधीही चांगले..सायबर पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध घेतला जाऊन आरोपींना अटक करण्यात येते, त्यानंतर कायदा अशा सायबर गुन्हेगारांना धडा शिकवतोच...हे सगळ इथ सांगण्याच कारण आहे, बुलडाणा सायबर पोलिसांनी केलेली एक धडाकेबाज कारवाई.. इंस्टाग्रामवरून  खामगावच्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवणाऱ्या आणि त्यानंतर लग्न करून द्या, नाहीतर तुमच्या मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करतो अशी धमकी देणाऱ्या  भामट्या सायबर गुन्हेगाराला बुलडाणा सायबर पोलिसांनी नंदुरबार वरून उचलून आणले. दिपक लक्ष्मण वाधवानी (२०) आरोपीचे नाव आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दिपक हा मूळचा जळगाव खान्देश च्या बाबानगर सिंधी कॉलनी भागातील राहणारा आहे. तो सध्या कुटुंबासह नंदुरबार येथे राहतो, तिथे त्याचा हॉटेल चा व्यवसाय आहे. काही महिन्याआधी खामगाव येथील २० वर्षीय कॉलेज तरुणीला दिपेश वाधवाणी याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तरुणीने  फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारल्यावर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले, त्यातून दोघांची मैत्री झाली. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर एकमेकांना दिले.

 खामगावात तिला भेटायला यायचा..!

 दरम्यान घनिष्ट मैत्री झाल्यानंतर दिपेश तरुणीला भेटायला बऱ्याचवेळा खामगावला यायचा. जवळीक वाढल्याने मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मी तुझ्याशी लग्न करील, तुला सुखात ठेवील...अशा पद्धतीने लग्नाच्या आणा - भाका दिपकने भविष्यातील कल्पनांचे अतिरंजित स्वप्न रंगवले. दिपेश वर विश्वास ठेवून निखळ प्रेम करणारी तरुणी त्याच्यासोबत सातत्याने इंस्टाग्राम वर चॅटिंग करत होती..मात्र काही दिवसानंतर दिपेशने तरुणीला इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह फोटो पाठवून, अश्लील चॅटिंग करून त्रास द्यायला सुरुवात केली. दरम्यान ही बाब तरुणीच्या भावाला माहीत झाली. सतत इंस्टाग्राम वापरत असल्याने बहिणीचे शैक्षणिक होत असल्याने तरुणीच्या भावाने दिपेश ला "माझ्या बहिणीशी यापुढे चॅटिंग करू नको" अशी ताकीद दिली.
 
  सायको प्रेमवीर खवळला..!

दरम्यान या प्रकारानंतर दिपेश मधील सायकोपणा जागा झाला. दिपेश ने तरुणीच्या भावाच्या व्हाट्सअप वर तरुणीचे आक्षेपार्ह फोटो पाठवले. तुम्ही तिच्याशी माझे लग्न लावून दिले नाही तर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी करीन अशी धमकी दिपेश ने दिली. या प्रकारानंतर १४ मे २०२३ रोजी तरुणीच्या कुटुंबीयांनी बुलडाणा सायबर पोलिसांनी तक्रार दिली. पोलिसांनी दिपेश विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासादरम्यान सगळे इलेक्ट्रॉनिक पुरावे प्राप्त करून काल,२९ ऑगस्ट रोजी आरोपी दिपेश वाधवानी याला सायबर पोलिसांनी अटक केली. दिपेश कडून त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, सायबर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सारंग नवलकार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळूंखे, पोलीस अंमलदार ज्ञानेश नागरे, राजू आडवे, दिपक जाधव, विकी खरात, शोएब अहमद यांनी ही कारवाई केली.