कॉलेजमध्ये प्रेम फुलले, तिला प्रेग्‍नंट केले... नंतर अचानक "जात' आडवी आली...; मोताळा तालुक्‍यातील तरुणीने पोलिसांना सांगितली कर्मकहानी!!

 
rape
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कॉलेजमध्ये असताना दोघांत प्रेम झाले. प्रेमातून ती प्रेग्‍नंट राहिली. त्‍यानंतर भानावर आलेल्या तरुणाला अचानक जात आठवली. तिला गर्भपातासाठी पैसे देऊ केले. पण ती लग्नावर ठाम राहिली. प्रकरण वाढल्याचे पाहून गावातील प्रतिष्ठितांनी मध्यस्‍थी करून लग्न लावून दिले. लग्न झालेय आणि आता करिअर मार्गी लागेपर्यंत बाळ नको असे म्‍हणून तिला त्‍याने गर्भपात करायला लावला. गर्भपात होताच तिचा छळ सुरू झाला. मात्र या छळातही तिला पुन्हा प्रेग्‍नंट केले. ती प्रेग्नंट होताच तिला घरातून हाकलून दिले. बुलडाण्याच्या भरोसा सेलमध्ये तडजोड न झाल्याने अखेर बोराखेडी पोलिसांनी तरुणीचा पती, सासू, दीर यांच्याविरुद्ध काल, १० जानेवारीला गुन्हा दाखल केला आहे. मोताळा तालुक्‍यातील चिंचपूरमध्ये ही घटना समोर आली आहे.

सध्या मोताळा शहरातील वॉर्ड क्रमांक १५ राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍यावरून गणेश विजय भोकरे (२६) सह त्‍याच्‍या आई, भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पीडित विवाहितेने तक्रारीत म्‍हटले आहे, की तिचे गणेश भोकरेसोबत २०१८ पासून प्रेमसंबंध होते. गणेश व ती एकाच काॅलेजमध्ये शिकत होती. त्याने तिला लग्नाचे वचन दिले. त्याच्यापासून तिला गर्भधारणा झाली. तिने गणेशकडे लग्नाची मागणी केली. त्‍यावेळी गणेशने जात वेगळी असल्याचे सांगून नकार दिला.

शिविगाळ करत गर्भपातासाठी किती पैसे पाहिजेत ते सांग, पिच्‍छा सोड, असे सांगितले. मात्र तिने गर्भपातास नकार दिला. अखेर गावातील प्रतिष्ठितांनी बैठक घेऊन ११ मे २०२१ रोजी दोघांचे लग्न लावून दिले. त्‍याच दिवशी गणेशने तिला गोड बोलून आता लग्न झालेय. सोडून जाऊ शकत नाही. सध्या आपण सेटल नाही. नोकरी करायची आहे, असे सांगून तिला गर्भपाताची गोळ्या खायला दिल्या. त्‍यानंतर रक्‍तस्‍त्राव सुरू होऊन तिचा गर्भपात झाला.

गर्भपात होताच पतीसह सासरच्यांनी तिचा जातीवरून छळ सुरू केला. सासूने गणेशला तरुणीजवळ झोपायलाही नकार दिला. नंतर तिचा छळ सुरू राहिला. काहीच दिवसांत परत तिला गर्भधारणा झाली. मात्र गणेशने आता बाळाची जबाबदारी घ्यायला नकार दिला व घरातून हाकलून दिले. ८ जानेवारीला रात्री ती माहेरावरून घरी परतली असता तू घरी कशी आली, असे म्‍हणत शिविगाळ करत बेदम मारहाण केली व हाकलून लावले. तिने पोलीस ठाणे गाठून पोलिसांत तक्रार नोंदवली.