चुलत दिराच्या आत्‍महत्‍येनंतर दोनच दिवसांत भावजयीने संपवले जीवन!; सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

 
गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या; नांदुरा तालुक्यातील घटना
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २२ वर्षीय तरुणाने शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ जानेवारीला पिंपळगाव सोनारा (ता. सिंदखेड राजा ) येथे घडली होती. त्या घटनेला उलटून काही तास होत नाही तोच त्या तरुणाच्या चुलत वहिनीने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना आज, १० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. सुनिता मनोहर खिल्लारे (२६, रा. पिंपळगाव सोनारा) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

८ जानेवारीला दुपारी चेतन परमेश्वर खिल्लारे (२२) या तरुणाने गावातीलच खंडूजी ठोसरे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतला होता. खंडूजी ठोसरे यांचे शेत चेतनच्या वडिलांनी बटाईने केले होते. दुपारी शेतात चक्कर मारायला गेल्यावर त्याने गळफास घेतला होता. त्यानंतर आज, १० जानेवारी रोजी चेतनची चुलत वहिनी सुनीता मनोहर खिल्लारे (२६) हिने सकाळी आठच्या सुमारास घरातच लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला.

घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. नात्याने सख्खे चुलत दीर- भावजय असलेल्या दोघांनी काही तासांच्या फरकाने आत्महत्या केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.  याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास सुरू आहे.