हरवलेल्या वडिलांच्या शोधासाठी लेकाची धडपड!; खामगाव शहरातील घटना

 
file photo
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरातून कुणाला काही न सांगता निघून गेलेल्या वडिलांच्या शोधासाठी सध्या लेकाची धडपड सुरू आहे.  नातेवाइक, परिसरात सगळीकडे शोध घेऊन थकल्यानंतर ६० वर्षीय वडिलांना शोधून आणण्यासाठी युवकाने शिवाजीनगर पोलिसांना साकडे घातले आहे.

प्रफुल्ल शेषराव हेलोडे (३३, रा सुटाळा बुद्रूक ता. खामगाव) या युवकाने वडील शेषराव ओंकार हेलोडे हरवल्याची तक्रार दिली आहे. ते १ जानेवारीच्या सकाळी ८ पासून घरातून निघून गेले आहेत.  रंग सावळा, उंची ५ फूट ८ इंच, शरीरबांधा मजबूत, डोळे काळे व डावा डोळा थोडा बारीक, डोक्याचे केस काळे पांढरे, अंगात भुरकट रंगाचा सफारी ड्रेस, पायात निळ्या रंगाची चप्पल असे त्‍यांचे वर्णन आहे. ते सकाळपासून घरातून गेले तर अजून परतले नाहीत, असे प्रफुल्ल यांना पत्नीकडून कळाले. त्‍यानंतर त्‍यांनी शोध सुरू केला आहे. तपास प्रदीप मोठे करत आहेत.

२०२२...तू सुद्धा...
२०२२ या वर्षाची सुरुवातही बेपत्ता होणाऱ्यांनी पोलिसांना सुखाची होऊ दिली नाही. १ आणि २ जानेवारीला जिल्ह्यातून ६ जण बेपत्ता झाले आहेत. यात १ जानेवारीला साहेबराव रामभाऊ रोडगे (६२, रा. संभाजीनगर, चिखली, पोलीस ठाणे चिखली), कु. शीतल कैलास तायडे (२१, रा. गंगानगर, जळगाव जामोद, पोलीस ठाणे जळगाव जामोद), सनी ओमप्रकाश कटारिया (३६, रा. गांधीनगर, चिखली, पोलीस ठाणे चिखली), २ जानेवारीला सौ. सविता शंकर गायकवाड (४०, सवडद, पोलीस ठाणे साखरखेर्डा), सौ. वर्षा अतुल शेगोकार (३६, रा. तीनपुतळे परिसर, शेगाव, पोलीस ठाणे शेगाव शहर) यांचा समावेश आहे.