LCB ने आवळल्या मोटारसायकल चोरांच्या मुसक्या! ८ मोटारसायकली जप्त..

 
बुलडाणा(अक्षय थिगळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्थानिक गुन्हे शाखेने दमदार कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात होत असलेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने त्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ३ लाख ४८ हजार रुपये किंमतीच्या ८ दुचाक्या जप्त करण्यात केल्या आहेत. एलसिबीने केलेल्या या धडाकेबाज कारवाईने दुचाकी चोरट्यांचे धाबे नक्कीच दणाणले असतील...
    मलकापूर शहर पोलीस स्टेशन, तसेच खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे मोटरसायकल चोरीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपी इमरान शहा दिलदार शहा (२६,रा.खैवाळी ता.नांदुरा) याला तब्यात घेऊन त्याच्या कडून होंडा शाईन कंपनीच्या ४ मोटार सायकली, एच.एफ. डिलक्स कंपनीच्या २, स्लेंडर प्लस कंपनीची १, फॅशन प्रो.कंपनीची १ अशा एकूण ८ मोटारसायकली जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या दुचाक्या ह्या खामगांव २, मलकापूर १, मलकापूर ग्रामीण १, अकोला जिल्हा १ अश्या विविध ठिकाणाहून आणल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. तसेच आरोपी योगेश वानखेडे (रा.मलकापूर )याच्या तब्यातून होंडा कंपनीची २८ हजार रुपये किंमतीची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई...
 ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधीक्ष अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक बी.बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांच्या आदेशाने सपोनि. रुपेश शक्करगे, पोहेकॉ. पुरुषोत्तम आघाव, पोना. गणेश पाटील, पोकॉ.जयंत बोचे, गणेश शेळके, विलास भोसले यांनी पार पाडली. या कारवाई बद्दल पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी टीम एलसीबीचे अभिनंदन केले आहे.