त्‍या दोन बुरखाधारी महिलांनी लांबवले लाखाचे दागिने!, खामगाव शहरातील घटना; बुलडाणा तालुक्‍यातील चोरट्यांचे कारनामे वाचून तर तुम्हीच व्हाल थक्‍क!

 
file photo
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन बुरखाधारी महिला सोन्याच्या दुकानात दागिने घेण्यासाठी आल्या. बरेच दागिने पाहिल्यानंतर पसंत नसल्याचे सांगून निघून गेल्या. पण नजर चुकवून ९१ हजार रुपयांचे दागिने घेऊन गेल्याची घटना ३१ डिसेंबरच्या दुपारी साडेबारा ते दुपारी तीनदरम्‍यान खामगावच्या मेन रोडवरील कस्‍तुरचंद त्र्यंबकदास ज्वेलर्समध्ये घडली. खामगाव शहर पोलिसांनी या महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

संदेश सतिश गुजराथी (५३, रा. गांधी चौक, खामगाव) यांनी या प्रकरणात काल, १ जानेवारीला दुपारी तक्रार दिली. एक अनोळखी बुरखाधारी महिला वय अंदाजे ३५ वर्षे व दुसरी महिला वय अंदाजे ५० वर्षे त्‍यांच्या कस्तुरचंद त्र्यंबकदास ज्वेलर्स दुकानात आल्या. सोन्याचे सेवनपीस व राजा रानी डोरले दाखवा, असे त्‍यांनी सांगितले. सेल्समनने त्यांना सेवनपीस व राजा रानी डोरले दाखविले. मात्र महिलांनी आम्हाला पसंत नाही, असे सांगून नजर चुकवून सोन्याचे सेवनपीसचे दोन सेट (किंमत ७९ हजार ४५० रुपये), सोन्याचे राजा- रानी डोरले एक जोड (किंमत १२ हजार ५०० रुपये) असा एकूण ९१ हजार ९५० रुपयांचा ऐवज लांबवला. तपास एएसआय बळीराम वरखेडे करत आहेत.

हतेडी खुर्दमध्ये अंगणात ठेवलेली १० कट्टे सोयाबीन गायब!
अंगणात ठेवलेली १० कट्टे सोयाबीन चोरट्याने चोरून नेली. ही घटना काल, १ जानेवारीला सकाळी हतेडी खुर्द (ता. बुलडाणा) येथे समोर आली. याप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शंकर सीताराम चव्हाण (४१) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. त्यांनी अंगणात ४० कट्टे सोयाबीन झाकून ठेवलेली होती. ३१ डिसेंबरच्या रात्री परिवारासह झोपलेले असताना १ जानेवारीच्या पहाटे तीनला त्यांचे वडील झोपेतून उठून बाहेर आले तर त्यांना सोयाबीन कट्ट्यांवर झाकलेली ताडपत्री उचकटलेली दिसली. त्यातील १० कट्टे सोयाबीन कमी आढळल्याने त्यांनी घरात येऊन सांगितले. ४० पैकी १० सोयाबीनचे कट्टे चोरट्याने लंपास केल्याचे कळताच बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. तपास बुलडाणा ग्रामीण पोलीस करत आहेत.

बिरसिंगपूरमध्ये घरातील दागिन्यांवर डल्ला
पुतण्याच्या लग्नाला जाण्यासाठी घरात ठेवलेले दागिने महिलेने शोधले असता आढळले नाहीत. घरातील सदस्यांना विचारपूस केली असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगतिले. ही घटना २६ डिसेंबर रोजी बिरसिंगपूर (ता. बुलडाणा) येथे घडली.  याप्रकरणी आज, १ जानेवारीला बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बेबी भास्कर जाधव (५८, रा. बिरसिंगपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १८ ते २० डिसेंबरदरम्यान घरातील एकदाणी पोत, गहू पोत असे एकूण ४ तोळे सोने (किंमत ६० हजार रुपये) पलंगावरील गादीच्या खाली काढून ठेवलेले होते. २६ डिसेंबर रोजी सकाळी नऊला अकोला येथे पुतण्याच्या लग्नाला जायचे होते म्हणून दागिने शोधले असता ते मिळून आले नाहीत. याप्रकरणी घरातील सदस्यांनाही विचारणा केली. मात्र सर्वांनी याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले. यावरून १ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.