खामगावच्या लेकीचा भुसावळमध्ये छळ

पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा
 
 
विवाहितेचा छळ
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्लॉट व दुकान खरेदीसाठी माहेराहून १५ लाख रुपये आण, अशी मागणी करत ३२ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. सासरच्या छळाला कंटाळून ती माहेरी खामगावला आली. काल, २२ नोव्हेंबरला तिने खामगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी पती, सासरा व पतीच्या काकूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सौ. प्रिया नरेश लालवाणी (३२) यांनी याप्रकरणात तक्रार दिली. तक्रारीनुसार, प्रियाचा विवाह २००९ साली भुसावळ (जि. जळगाव) येथील नरेश मनोहरलाल लालवाणी याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर तुम्हाला प्लॉट घेऊन देऊ, असे आश्वासन प्रियाच्या वडिलांनी नरेशच्या वडिलांना दिले होते. मात्र नंतरच्या काळात प्रियाच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने ते प्लॉट खरेदी करून देऊ शकले नाहीत. त्यामुळे सुरुवातीचे दोन- तीन वर्षे चांगले वागविल्यानंतर प्रियाचा पती व सासरा छळ करू लागले. दिसायला सुंदर नाही म्हणून प्रियाला मारहाण करण्यात येत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. २०१३ च्या दिवाळीनंतर पती नरेशने प्रियाचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला व घरातून हाकलून लावले. त्यामुळे प्रिया माहेरी खामगावला आली. त्यानंतर दोन- तीन महिन्यांनी प्रियाचे सासरे खामगावला आले. यापुढे तुला व तुझ्या पतीला वेगळे घर घेऊन देऊ, असे सांगून प्रियाला पुन्हा सासरी घेऊन गेले.

घर घेण्यासाठी प्रियाचे काका व भावाने तीन लाख रुपये प्रियाच्या सासरच्यांना दिले. त्यानंतर प्रियाच्या पतीने वेगळे घर घेतले व तो पत्नी प्रियासह राहू लागला. त्यानंतर पुन्हा तीन वर्षांनी दुकान घेण्यासाठी माहेरवरून पैसे आण, अशी मागणी नरेश प्रियाकडे  करू लागला. मात्र प्रियाच्या भावाची आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने प्रियाच्या खंडवा (मध्यप्रदेश) येथील बहिणीने दोन लाख रुपये प्रियाच्या पतीला दिले. मात्र त्यानंतरही प्रियाचा छळ सुरूच होता. नरेशची काकू हेमा देवानंद लालवाणी ही नरेश व प्रियामध्ये भांडणे लावून देत होती.

तुझ्या नवऱ्याला तुझी गरज नाही. त्याचे सर्व प्रकारचे समाधान मी करून देते, असे ती प्रियाला सांगत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबद्दल प्रियाने नरेशला विचारणा केली असता नरेशने तिला निर्दयीपणे मारहाण केली. १५ मार्च २०२० रोजी प्लॉट खरेदी करण्यासाठी भावाकडून १५ लाख रुपये आण, अशी मागणी करत पती व सासऱ्याने प्रियाला बेदम मारहाण केली. अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने काढून तिला घरातून हाकलून दिले. तेव्हापासून प्रिया माहेरी खामगाव येथे राहत आहे. अखेर काल तिने पोलिसांत धाव घेत छळाची तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी प्रियाचा पती नरेश मनोहरलाल लालवाणी, सासरा मनोहरलाल किसनचंद लालवाणी व नरेशची काकू हेमा देवानंद लालवाणी (तिघेही रा. सियाराम कॉम्प्लेक्स, सिंधी कॅम्प,भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.