बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर मिळवली नोकरी ! आधी बोगस दिव्यांग सर्टिफिकेट काढले; फिटनेस चाचणीत जिल्हा शल्यचिकीत्सक म्हणतात, "ये तो फीट है..!"वाचा कसा आहे घोळ..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बनावट दिव्यंगत्वाच्या प्रमाणपत्राचा आधार घेऊन प्रशांत एकडे यांनी राज्य परिवहन महामंडळात लिपिकपदी नोकरी मिळवल्याची तक्रार पाडळी येथील रवींद्र सिरसाट यांनी केली आहे.

शासन तथा एसटी महामंडळाची फसवणूक केल्याने प्रशांत एकडेविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रवींद्र सिरसाट यांनी बुलढाणा विभाग नियंत्रकांकडे केली आहे. लेखा लिपिक असलेल्या एकडे यांनी २०१६-१७ मध्ये सरळ सेवा भरतीसाठी खोट्या अपंग प्रमाणपत्राच्या आधारे दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवली. २२ जून २०११ रोजी अपंगत्व प्रमाणपत्र प्राप्त केले. मात्र, निवड झाल्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांकडील फिजीकल फिटनेस सर्टिफिकेट देताना फिट असल्याबाबत प्रमाणपत्र दिले आहे. याचाच अर्थ सिव्हील सर्जन यांनी त्यांच्या शारीरिक तपासणीवेळी कोणतेही दिव्यंगत्व आढळून आले नाही व तसा उल्लेख त्यांनी केलेला आहे. तसेच आरटीओंकडे जे ड्रायव्हिंग लायसन्स काढले, त्यावेळी ते स्वयंघोषणापत्र भरावयाचे असते, त्यामध्ये त्यांना शारीरिकदृष्ट्या कोणताही अवयव कमजोर आहे किंवा हात, पाय निकामी आहे अथवा हालचाल करताना हातापायाची हालचाल होत नाही, असा कोणताही विकार नसल्याचे सदरील फॉर्ममध्ये लेखी देऊन स्वाक्षरी केली आहे. याचाच अर्थ ते दिव्यांग नाही हे स्वतः लेखी स्वरुपात कबूल करतात, असेही तक्रारकर्त्यांने नमूद केले आहे.