बुलडाण्यात भलतेच कांड! डॉ.सौरभ संचेतींना साडेआठ लाखांनी लुटले; प्रकरणाला समलिंगी संबंधांची किनार?डॉक्टरला नग्न केले, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी! पोलिसांनी ५ आरोपींना केली अटक

 
Vbbn
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातील नामवंत हृदयरोगतज्ञ डॉ.सौरभ संचेती यांना एका टोळक्याने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत साडेआठ लाख रुपयांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एवढ्यावर देखील त्या तरुणांच्या टोळक्याची भूक भागली नाही म्हणून त्यापैकी एक तरुण पुन्हा डॉक्टरला पैसे मागायला घरी गेला, न दिल्यास मुलाबाळांना कुटुंबांना जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर डॉक्टर त्या तरुणांना वैतागल्याने डॉक्टरांनी बुलडाणा शहर पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी ७ ते ८ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी ५ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. 
अजय नागपुरे, दीक्षांत नवघरे, विशाल गायकवाड, सूरज पसरटे, आदेश राठोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून उर्वरित ३ आरोपी अद्याप फरार आहेत. डॉ.संचेती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार घटना,१३ ऑक्टोबरची आहे. घटनेच्या दिवशी दुपारी डॉक्टरांना एक फोन आला, डॉक्टरांना परिचित असलेल्या अजय नागपुरे याची ओळख दाखवत घरी एक कॅन्सर चा पेशंट आहे, तुम्ही तपासायला घरी येऊ शकता का अशी विचारणा केली व स्वतःचे नाव दीक्षांत नवघरे असल्याचे सांगत घराचा पत्ता विजय वाईन बार, खामगाव रोडच्या बाजूला शाहू कॉलेजला जाणारा रोड असल्याचे सांगितले.
डॉक्टर गेले अन् कार्यक्रम झाला...
 
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फोनवर बोलणे झाल्यावर ते स्वतःच्या स्कुटीने डॉक्टर संचेती दिलेल्या पत्त्यावर गेले. तिथे रस्त्यावरील बाईकवर इसमाने हात देऊन त्याने तो दीक्षांत नवघरे असल्याचे सांगितले, मीच तुम्हाला फोन केला होता असे म्हणत दीक्षांत डॉक्टर सौरभ यांना घेऊन घरी गेला. डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीनुसार "त्या" घरात २० ते २५ वयोगटातील ७ ते ८ तरुण होते. त्यांनी एकाएकी डॉक्टरच्या हातावर, कानावर, पाठीवर मारहाण केली. कोयत्यासारख्या शस्त्राचा धाक दाखवून डॉक्टरच्या पँटच्या खिशातून १० हजार रुपये काढले. डॉक्टरच्या अंगावरील कपडे काढून नग्न केले, दीक्षांत याच्याही अंगावरील पूर्ण कपडे काढलेले होते. डॉक्टरला दीक्षांतच्या जवळ उभे करून त्यांचा अश्लील व्हिडिओ शुट करण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांना आरोपी तरुणांनी दुचाकीने वृंदावन नगरातील मोकळ्या जागेत नेले. तिथे २ ते ३ जण पांढऱ्या कारमधून आले,त्यांनी आपसात चर्चा केली. तिघे डॉक्टरांचा परिचित अजय नागपुरे होता. "हे लोक तुमचा व्हिडिओ व्हायरल करतील, तुमच्या मुलांच्या जीवाचे बरे वाईट करतील, तुम्ही त्यांना २० लाख रुपये द्या, बाकी मी पाहून घेतो" असे अजय डॉक्टरला म्हणाला. डॉक्टरने घाबरून मित्र राहुल कोटेचा यांच्याकडून साडेआठ लाख रुपये घेऊन आरोपी तरुणांच्या जवळ दिले...
आरोपींची भूक वाढली..!
दरम्यान या घटनेनंतर दिनांक १८ ऑक्टोबरला डॉक्टरला पुन्हा दीक्षांतचा फोन आला. मला तुम्हाला भेटायचे आहे असे त्याने सांगितले तेव्हा डॉक्टरांनी हॉस्पिटलला भेटायला बोलावले. दीक्षांत डॉक्टरच्या केबिनमध्ये भेटायला आला,तुमचा नग्न व्हिडिओ माझ्याकडे आहे, उर्वरित पैसे असे दीक्षांत डॉक्टरला म्हणाला. यावेळी डॉक्टरांनी हॉस्पिटल मॅनेजरला केबिनमध्ये बोलावले असता दीक्षांत तिथून निघून गेला. आरोपी आपल्याला सातत्याने त्रास देतील अशी खात्री झाल्याने डॉक्टर संचेती यांनी बुलडाणा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली...
५ आरोपींना अटक..
पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अजय नंदकुमार नागपुरे(३०, रा. शिवशंकरनगर, बुलडाणा) याला राहत्या घरून अटक केली. गुन्हा दाखल होत असल्याची कुणकुण लागल्याने आरोपींनी पसार होण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी ३ पथके रवाना केली. छत्रपती संभाजी नगर जवळून पोलिसांनी दीक्षांत नवघरे, विशाल मनोहर गायकवाड, आदेश सुनील राठोड व सूरज पसरटे यांना अटक केली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांनी दिली. पुढील तपास पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर करीत आहेत..!
प्रकरणाला समलिंगी संबंधाची किनार?
दरम्यान या प्रकरणाला समलिंगी संबंधाची किनार असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला दीक्षांत हा याआधी खुनाच्या प्रकरणातील आरोपी आहे. वर्षभराआधी जालना जिल्ह्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील एका कक्षसेवकाचा समलिंगी संबंधांतून खून करण्यात आला होता व प्रेत राजूर घाटाजवळील एका शेतात टाकण्यात आले होते. आधी एका घरात कक्षसेवकाचे अश्लील व्हिडिओ आरोपींनी काढले होते, त्यानंतर त्याला पैशासाठी मारहाण करीत असताना कक्षसेवकाचा मृत्यू झाला होता. बुलडाण्यात समलिंगी संबंधांत अडकवून आर्थिक लूट करणारी टोळी सक्रिय आहे का याचाही तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असला तरी याप्रकरणाची दुसरी बाजू देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पोलीस तपासात यातील बऱ्याच बाबी स्पष्ट होतील...!!