चिखलीत हे चाललय काय? जो तो म्हणतो बघुन घेईल..! गावगुंडांची दहशत वाढली, रस्त्यात मोटारसायकली आडव्या लावून व्यापारी तरुणाला लुटले, मदतीसाठी धावणाऱ्यावरही चढवला हल्ला! महाबीज कार्यालयासमोरची घटना...

 
Fhbj
चिखली(गणेश धुंदळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीत गावगुंड, गल्लीगुंडांनी गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवली आहे. काल, २३ नोव्हेंबरच्या संध्याकाळी चारच्या सुमारास चौघांनी एका व्यापारी युवकावर हल्ला चढवत लुटले. मोटारसायकली आडव्या लावून युवकाचे मालवाहू वाहन अडवण्यात आले. मारहाण करत त्याच्या खिशातील ९ हजार रुपये हिसकावण्यात आले. त्या युवकाच्या मदतीला धावलेल्या एका नागरिकालादेखील मारहाण करून त्याच्या गळ्यातील एक तोळ्याचा ५० हजार रुपयांचा सोन्याचा गोफही हिसकावून नेण्यात आला. चिखली देऊळगावराजा रोडवरील महाबीज कार्यालयासमोर ही घटना घडली. चिखली शहरात अशा घटना सातत्याने घडत आहेत, गावगुंडांची दहशत एवढी आहे की चिखलीचा बिहार होतोय की काय अशी चर्चा सामान्य नागरिकांत सुरू आहे.
चिखली शहरातील जुन्या गावातील रहिवासी असलेला शुभम गणेश तुपकर (वय २७) हा युवक बिसलेरी एजन्सीचा व्यवसाय करतो. काल, २२ नोव्हेंबरच्या सायंकाळी चार, साडेचारच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे आपल्या मालवाहू गाडीतून मालाची वाहतूक करण्यासाठी मेहकर फाटा येथे निघाला होता. शहरातील महाबीज कार्यालयासमोर गोरक्षण वाडी परिसरात राहणाऱ्या विकास कुटे, शिवा माने, लखन कुसळकर व समाधान उर्फ अर्जुन अत्तार यांनी शुभम तुपकर याच्या मालवाहू गाडीसमोर आपली दुचाकी आडवी लावून रस्ता अडवला.
 मारहाण करत शुभमच्या खिशातून रोख दहा हजार रुपये जबरदस्ती काढून घेतले. यावेळी तुपकरला सोडवण्यास आलेल्या रवी मदन महाजन यांनाही मारहाण करत त्यांच्या गळ्यातील एक तोळा सोन्याचा गोफ (किंमत ५० हजार) हिसकावला. दरोडेखारांमध्ये एक बाहेरगावचा वाहनचालकही असल्याचे सांगण्यात येत आहे. शुभम तुपकरने पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची सविस्तर तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३९२, ३४१, ३४, सह कलम १२८, ३६, १७७ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीनसिंह चव्हाण करीत आहेत.
अवघ्या काही तासांत दरोडेखोरांना पकडले..
दरम्यान गुन्हा दाखल होताच ठाणेदार संग्राम पाटील यांनी तातडीने तपासचक्र फिरवली. या गुन्ह्यातील विकास अशोक कुटे, अशोक शिवाजी माने व लखन ज्ञानेश्वर कुसळकर या तिघांना रात्रीच अटक करण्यात आली आहे.