शेगावमध्ये हे चाललंय काय? भररस्त्यात विवाहितेची छेड! जाब विचारणाऱ्या पतीलाही बदडले!!

 
महिलेचा छळ
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भररस्त्यात १९ वर्षीय नवविवाहितेची छेड काढण्यात आल्याची घटना काल, २ जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास शेगाव शहरातील जुना महादेव मंदिर परिसरात घडली. घडल्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या विवाहितेच्या पतीला छेड काढणाऱ्यासह त्‍याच्या भावाने व वडिलाने बेदम मारहाण केली. याप्रकरणी आज, ३ जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय नवविवाहिता काल रात्री शेगाव शहरातच राहणाऱ्या आईच्या घराकडे पायी जात होती. जुना महादेव मंदिर परिसरातील एका दुकानासमोर तरुणांचे टोळके उभे होते. विवाहिता दुकानासमोरून जात असताना टोळक्यातील राजेश गजानन घाटोळ याने बाकी मुलांना "बाजूला व्हा, हिला एकदा पाहतोच' असे म्हणत विवाहितेचा वाईट उद्देशाने हात धरला.

केस धरून जवळ ओढत शिविगाळ केली. कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करून विवाहिता घरी आली व पतीला घडला प्रकार सांगितला. त्यानंतर विवाहिता व पती असे दोघे जण याचा जाब विचारण्यासाठी राजेशच्या घरी गेले. तेव्हा राजेश, त्याचा भाऊ शिवा आणि व वडील गजानन घाटोळ यांनी मिळून विवाहितेच्या पतीला बेदम मारहाण केली. विवाहितेच्या पतीला डोळ्याला व उजव्या हाताला दुखापत झाली.

भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करायला आलेल्या मयूर मसने यालाही मारहाण केली, अशी तक्रार आज पीडित विवाहितेने शेगाव शहर पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी राजेश गजानन घाटोळ, शिवा गजानन घाटोळ व गजानन  घाटोळ (सर्व रा. डोभाळवेस, शेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.