कर्जबाजारीपणाने घेतला शेतकऱ्याचा बळी! मोताळा तालुक्यातील तरोड्याची घटना! जिल्ह्यात चालू वर्षात ८० पेक्षा अधिक आत्महत्या;
नेत्यांना सोयरसुतक नाही; सांत्वन भेटीचेही फोटो सोशल मीडियावर अपलोड करतात..
Sat, 6 May 2023

मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात दिवसागणिक शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढत आहे. चालू वर्षात आजपावेतो ८० पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद सरकार दफ्तरी आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा ,निसर्गाचा लहरीपणा, मुलांचे शिक्षण,मुलींचे लग्न आदी कारणांपायी शेतकरी स्वतःला संपवून घेत असल्याचे विदारक वास्तव आहे. मात्र असे असले तरी सत्तेच्या सुखासाठी धडपडणाऱ्या राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांच्या मरणाचे फारसे दुःख असल्याचे जाणवत नाही. सांत्वन भेटी घ्यायला गेलेले नेतेही उपकार केल्यासारखे त्या प्रसंगाचे फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करतात, किती हा निर्बुद्धपणा? मोताळा तालुक्यातील तरोडा येथेही काल, एका शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवले.त्याच्या आत्महत्येचे कारणही कर्जबाजारीपणाच होते.
संदीप शंकर सायखेडे(४०, रा. तरोडा) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. कधी अतिवृष्टी, तर कधी अवकाळी या निसर्गाच्या लहरीपणामुळे सातत्याने नापिकीचा सामना संदीप सायखेडे यांना करावा लागत होता. त्यामुळे सातत्याने बँकेचे कर्ज व खासगी कर्ज वाढत गेले. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते, त्यातच संदीप सायखेडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्यात पत्नी, २ मुली,१ मुलगा,वडील व भाऊ असा परिवार आहे.