शेगाव शहरातील घटना; मिरवणूक पाहण्यासाठी आला होता रेहान, पण झालं असं की...

 
शेगाव
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मिरवणुक पाहण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलाला अनोळखी व्यक्तीने फायटर मारून जखमी केल्याची घटना काल ११ एप्रिलच्या रात्री शेगाव शहरातील गांधी चौकात घडली. याप्रकरणी मुलाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली , त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. 
शेख रेहान शेख वसीम (११ वर्ष )असे फिर्यादी मुलाचे नाव आहे. महात्मा ज्योतिबा फुले जयंतीची मिरवणूक पाहत असताना मिरवणुकीतील काही मुलांचे त्यांच्या त्यांच्यात वाद सुरू होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने कारण नसताना रेहानच्या डोक्यावर डाव्या बाजूने फायटर मारून जखमी केले. डोक्याला मार लागल्याने त्याला दुखापत झाली आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव माहिती नाही, परंतु त्याचा चेहरा लक्षात आहे, असे रेहान याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. आरोपीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यासाठी शेगाव पोलीस स्टेशन समोर मोठी गर्दी होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर ही गर्दी ओसरली. तर यावेळी एसडीपीओ विनोद ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली व शांततेचे आवाहन केले. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव करत आहेत.