क्रिकेट स्पर्धेत बॅट-बॉलऐवजी चाकू चालला; आयोजक जखमी, नांदुरा तालुक्यातील घटना

 
नांदुरा पोलीस ठाणे
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : क्रिकेटच्या मैदानातून का हाकलले असे म्‍हणून क्रिकेट टुर्नामेंटच्या आयोजकावरच चाकूहल्ला करण्यात आला. छातीत चाकू लागल्याने तो जखमी झाला आहे. ही घटना नांदुरा तालुक्यातील पिंपळखुटा धांडे येथील मैदानावर २३ डिसेंबरला घडली. याप्रकरणी काल, २७ डिसेंबर रोजी नांदुरा पोलीस ठाण्यात हल्लेखोर तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुद्धभूषण संजय वाकोडे (२१, रा. पिंपळखुटा धांडे, ता. नांदुरा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सध्या जिल्हाभर क्रिकेटच्या टुर्नामेंटचा माहोल सुरू आहे. हिवाळ्यात अनेक गावांत टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन केले जाते. आयोजकांची स्पर्धा नीट पार पाडण्यासाठी धावपळ सुरू असते. पिंपळखुंटा धांडे येथे क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन सोहम आनंदा वाकोडे (२१) व  गावातील काही तरुणांनी केले होते. २३ डिसेंबर रोजी मॅच सुरू असताना बुद्धभूषण वाकोडे हा मैदानावर येऊन आरडाओरड करत होता. त्यामुळे मॅचमध्ये अडथळा निर्माण होत होता.

त्यामुळे आयोजक असलेल्या सोहम वाकोडे याने त्याला मैदानावरून बाहेर जायला सांगितले. तेव्हा बुद्धभूषण गावात गेला. थोड्या वेळात त्याने गावातून चाकू आणला. मैदानावरून बाहेर का हाकलून लावले, असे म्हणत त्याने सोहमसोबत वाद घातला व त्याच्या छातीत चाकू मारून जखमी केले, अशी तक्रार सोहमचे वडील आनंदा सोमाजी वाकोडे यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून बुद्धभूषणविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.