धक्कादायक भरस्त्यात गाडी अडवून, तिघांनी लुटले! देऊळघाट मार्गावरील आज सकाळची घटना.. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा..

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दुचाकीस्वार तिघांनी मालवाहू गाडी अडवून मोबाईल आणि पाकीट चोरी केल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी सकाळी धाडनाका- देऊळघाट मार्गानजीक घडली आहे. दरम्यान, तक्रारीवरून बुलडाणा पोलिसांनी तिघा अज्ञात दुचाकीस्वारांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आकाश राजेंद्र परदेशी (२३ वर्ष) हे मालवाहू महिंद्रा पिकप गाडीचे मालक आहेत. ते चालक अविनाश पाटील यांच्यासोबत तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथून आंबे घेऊन पाचोरा येथे जाण्यास निघाले होते. दरम्यान आज सकाळी ४ वाजेच्या आसपास धाड नाक्यावरील आईस फॅक्टरी जवळ तिघा दुचाकीस्वारांनी त्यांचे वाहन अडविले. पिण्यासाठी पाणी पाहिजे असा इशारा त्यांनी केला होता. त्यांनतर त्यापैकी एका जणाने गाडीचे गेट उघडून समोर ठेवलेला मोबाईल आणि पाकीट उचलले. पाकिटात १२०० रुपये ठेवले होते. त्यानंतर तिघा दुचाकीस्वारांनी तेथून बुलढाण्याच्या दिशेने पळ काढला. सदरची दुचाकी विना नंबरची होती असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.