कुणी सोन्याच्या गिन्‍न्या देत असेल तर... पोलीस म्‍हणतात...

 
gold
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः किनगाव राजा पोलीस ठाण्याच्‍या हद्दीत अज्ञात व्यक्तीने त्याच्‍याकडे सोन्याच्या गिन्न्या स्वस्तात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगून दापोली येथील नागरिकाची ६ लाख ९० हजार रुपयांची शस्त्राचा धाक दाखवून व मारहाण करून लूट केली आहे. किनगाव राजा पोलिसांनी या प्रकरणात गुन्‍हा दाखल केला असून, तपास युद्धपातळीवर सुरू आहे. खोदकामात सोने सापडले आहे. त्‍या गिन्न्या कमी किंमतीत विकायच्या असल्याच्या भुलथापा मारून यापूर्वीही अशा प्रकारे लुटमारीच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. मात्र कुणीही अशा भुलथापांना बळी पडू नये. अनोळखी व्‍यक्‍तींनी स्वस्तात सोने देण्याचे आमिष दिल्यास नजीकच्‍या पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्ष, बुलडाणा येथील दूरध्वनी क्रमांक 07262-242400 वर तातडीने संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे.
केवळ सोन्याच्‍या गिन्न्याच नाही तर दागिन्यांना पॉलीस करून देतो असे म्हणून महिलांकडील दागिने वितळूण फसवणुकीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशा प्रकारे चोरट्यांची टोळी सक्रीय असून, महिलांनी अशा भुलथापांना बळी पडू नये. आम्ही पोलीस आहोत, असे सांगून झडती घेऊन दागिने व पैसे घेऊन पळून जातात. अशा तोतया पोलिसांपासूनही सावध रहावे. आपल्या परिसरात अनोळखी व्यक्‍ती वारंवार येत असल्यास व पाळत ठेवत आहे. असा संशय वाटल्यास त्या व्यक्तीची विचारपूस करावी. मौल्यवान दागिने, रोख रक्कम घरात ठेऊन बाहेरगावी जाऊ नये. नागरिकांनी स्वस्तात सोन देण्याच्‍या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. बाहेरगावी जाताना जवळचे पोलीस स्टेशनला कळवावे. फसवणुकीपासून दक्ष रहावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.