झोपेतून उठायला थोडा उशीर झाला तर तिला दिवसभर उपाशीपोटी पाण्यात उभे ठेवायचे!; बुलडाण्यात विवाहितेची तक्रार

 
महिलेचा छळ
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्नात हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा प्रचंड शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. झोपेतून उठायला तिला थोडाही उशीर झाला तर दिवसभर उपाशीपोटी तिला पाण्यात उभे ठेवत शिक्षा देण्यात येत असल्याची धक्कादायक तक्रार विवाहितेने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात काल, ९ जानेवारीला केली. माहेरवरून २ लाख रुपये आणले नाही तर तलाक देण्याची धमकीही दिली जात होती, असे विवाहितेने म्‍हटले आहे. तक्रारीवरून तिच्या पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाजीया परवीन इरफान खान या विवाहितेने याप्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, २०१९ मध्ये तिचा विवाह घाटकोपर मुंबई येथील इरफान खान नूर मोहम्मद खान याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे १०-२० दिवस तिला चांगले वागविले. नंतर तिच्या अंगावरील सर्व दागिने सासरच्या लोकांनी काढून घेतले. उपाशीपोटी तिच्याकडून घरातील सर्व कामे करून घेण्यात येत होती. तिला झोपेतून उठण्यास थोडाही उशीर झाल्यास दिवसभर पाण्यात उभे राहण्याची शिक्षा सासरचे लोक देत होते.

लग्नात हुंडा कमी दिला म्हणून नवरा मारहाण करत होता. सासू हाताला चटके देत होती. दिवसभर घरात डांबून ठेवत होती, असे तक्रारीत म्हटले आहे. कधीतरी त्रास कमी होईल या आशेपोटी ती हा सर्व त्रास सहन करत होती. तिचा नवरा इरफानचे याआधी सुद्धा दोन लग्न झाल्याचे तिला कळले होते. एक दिवस तिची बहीण तिच्या घरी आली असता तिने बहिणीला या त्रासाबद्दल सांगितले. त्यानंतर त्रासाला कंटाळून ती माहेरी बुलडाण्यातील इंदिरानगरात आली.

आई- वडिलांना हकीकत सांगितली. जोपर्यंत २ लाख रुपये आणत नाही तोपर्यंत सासरी नांदायला येऊ नको, अशी धमकी सासू, सासरे व पती देत होता. महिला तक्रार निवारण कक्षात सुद्धा समझोता न झाल्याने तिने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून विवाहितेचा पती इरफान खान नूर मोहम्मद खान, सासू रजियाबी नूर मोहम्मद, सासरा नूर मोहम्मद खान व दीर दानिश व समोशिद्दीन (सर्व रा. घाटकोपर, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.