ओळखीच्या माणसावर विश्वास ठेवला अन् अल्पवयीन मुली सोबत वाईट घडलं..! आपबिती सांगताना ढसाढसा रडली...धाडची घटना

 
धाड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ओळखीच्या ४२ वर्षीय पुरुषावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत दुचाकीने प्रवास केला. परंतु, अल्पवयीन मुलीची चालत्या दुचाकीवर त्याने छेड काढल्याचा निंदाजनक प्रकार समोर आला आहे. 
पिडीत अल्पवयीन मुलगी धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातील आहे. बुलडाणा येथे तिचे येणे जाणे सुरू असते. धाड बस स्थानकावरून बुलढाण्यासाठी बसेसचे प्रमाण कमी आहे. दरम्यान १८ जुलै रोजी पिडीता बुलढाणा येथे येण्यासाठी धाड बस स्थानकावर बसची वाट पाहत उभी होती. त्यावेळी तिथे भगवान उबाळे (४२ वर्ष) आला. तुला बुलढाणा येथे सोडून देतो असे तो म्हणाला. पिडीत अल्पवयीन मुलगी त्याला ओळखत असल्याने, विश्वास ठेवून ती त्याच्या दुचाकी वर बसली. परंतु धाड पासून काही अंतरावर गेल्यानंतर उबाळेनी मुलीसोबत दुचाकीवरच छेडखानी सुरू केली. या प्रकाराला अल्पवयीन मुलगी घाबरली. तिने लगेचच दुचाकी थांबविण्याची सांगितले. परंतु उबाळे याने दुचाकी काही थांबवली नाही. यामुळे नाईलाजास्तव जीव मुठीत घेऊन पिडीत मुलीने दुचाकीवरून उडी मारली असे तक्रारीत म्हटले आहे. 
   
याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने धाड पोलीस ठाण्यात सगळी हकीकत सांगितली. आपबिती सांगताना पोलिसांसमोर ढसाढसा रडली. तक्रारीवरून धाड पोलिसांनी भगवान उबाळे याच्या विरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. उबाळे याला अटक ही करण्यात आली आहे. या घटनेमुळे, ओळखीच्या माणसावर विश्वास ठेवायचा की नाही? असा सवाल उपस्थित होतो. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात महिला, बाल अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या असून महिला सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.