कांडकरी कोतवाल!खामगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना घातला कोट्यवधींचा गंडा!

 
Dvjn
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) खामगाव तालुक्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील विविध गावांमधून शेकडो शेतकऱ्यांकडून सोयाबीन, तूर, हरभरा अश्या पिकांचा माल विकत घेत वाढीव भावाने पैसे देणार असल्याचे सांगून 
शहापूरच्या कोतवालाने कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात घेताच २० शेतकऱ्यांनी १ एप्रिल रोजी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. शेतमालाचा व्यापार करणाऱ्या ठगबाज कोतवाला विरुद्ध तक्रार दिली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. २० जणांनी दिलेल्या तक्रारीनुसार ठकबाज कोतवालाने तब्बल ८१ लाख ५ हजार ८८४ रुपयांनी त्यांना गंडा घातला. इतकचं नाही तर त्याने शेकडो शेतकऱ्यांना गंडा घातल्याचे शेतकरी सांगतात. यानुसार त्याने कोट्यावधी रुपयांनी खामगाव तालुक्यातील विविध गावाच्या शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे.
सुनील हरिदास पारखडे असे ठगबाज व्यापाराचे नाव असून तो शहापूर येथील तलाठी कार्यालयात कोतवाल या पदावर कार्यरत आहे. मागील काही वर्षांपासून तो परिसरातील शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घ्यायचा. नेहमी वेळेच्या आत शेतकऱ्यांना योग्य तो भाव द्यायचा. मात्र यावेळी असे झाले नाही, अकोला जिल्ह्यातील तसेच खामगाव तालुक्यातील शहापूर, बोथा काजी, तसेच जवळच्या विविध गावातील शेतकऱ्यांकडून त्याने शेतमाल विकत घेतला. परंतु यंदा त्याने मोबदला दिला नाही. वारंवार त्याच्याकडे पैसे मागीतले परंतु त्याने त्याचा फोन आता बंद केला.आणि गावातून फरार झाला आहे.असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अश्या पद्धतीने आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांना समजले. त्यांनतर त्यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली, सध्या प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असून फिर्यादींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.