कसली आली मारिया अन् कसलं आलंय प्रेम; मेहकरच्या दिपक जैताळकरला ६२ लाखांनी ऑनलाईन फसवणारे निघाले दोन नायजेरीयन भामटे; बुलडाणा सायबर पोलिसांनी दिल्लीतून उचलून आणले,

दाखवून दिलं "कानुन के हात लंबे होते हैं"! फेसबुकवर झालेल्या मैत्रीने झाला होता उच्चशिक्षित जैताळकरचा घात! वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण; बातमी वाचून बुलडाणा सायबर पोलिसांसाठी म्हणाल"सैल्युट"!

 
police
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  मेहकर शहरात पॅथॉलॉजी लॅब चालवणारे दिपक जैताळकर तसे उच्चशिक्षित.. एमएससी झालेले..पण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले.. फेसबुकवर लंडन मधील  मारिया असल्याचे भासवत सायबर गुन्हेगार असल्याने नायजेरियन भामट्यांनी दिपक जैताळकर यांच्यांशी ऑनलाईन मैत्री केली, प्रेमही ऑनलाईनच केले..जैताळकर प्रेमाच्या मोहात अडकल्याची खात्री होताच भामट्यांनी यांच्याकडून पैसे उकळायला सुरुवात केली.. ६५००० ग्रेट ब्रिटिश पाउंड चे एक गिफ्ट पाठवले असून ते दिल्ली विमानतळावरून सोडवून घेण्यासाठी कस्टम क्लिअरन्स चार्जेस, मास्टर कार्ड पाठवण्यासाठी, मास्टर कार्ड अपडेट करण्यासाठी, ज्युडीशिअल कौन्सिल कडून मंजुरी मिळवण्यासाठी व इतर विविध प्रोसेसिंग फी च्या नावाखाली वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून रकमेची मागणी केली. प्रेमाच्या मोहात अडकलेल्या जैताळकर यांनी विश्वास ठेवून वेगवेगळ्या बँकेच्या खात्यातून कधी आरटीजीअस, चेक व फोन पे द्वारे  तब्बल ६२ लाख ६९ हजार ७०० रुपये पाठवले. एवढे करूनही गिफ्टचे पार्सल न मिळाल्याची खात्री झाल्यानंतर जैताळकर यांनी बुलडाणा सायबर पोलिसांत १५ ऑगस्ट तक्रार दिली होती. दरम्यान बुलडाणा सायबर पोलिसांनी या किचकट प्रकरणाच्या तळाशी जात फसवणूक करणाऱ्या नायजेरियन भामट्यांना दिल्लीतून उचलून आणले आहे, दिपक जैताळकर यांची फसवणूक करणारी मारिया नसून नायजेरियन तरुण असल्याचे समोर आले आहे. २०१५ पासून ते दिल्लीत राहत होते.
 

 
निजोस फ्रँक(३०) आणि अलाई विसंट (३२) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत,त्यांना दिल्लीच्या संतनगर बुरारी भागातून ताब्यात घेण्यात आले. बुलडाणा सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी जैताळकर यांनी ऑनलाईन पाठवलेल्या रकमेचे बँक अकाऊंट, एटीएम फुटेज, फेसबुक अकाऊंट, ओला सर्व्हिस, पेटीएम, फोन पे, गुगल अकाऊंट, गुगल पे, इंडिगो एअरलाइन्स, इन्शुरन्स कंपनी यांच्याकडून गुन्ह्याच्या संबंधातील वेगवेगळी माहिती संकलित केली. तांत्रिक माहितीचे अत्यंत बारकाईने विश्लेषण केल्यानंतर आरोपी  उत्तरप्रदेशातील बरेली, दिल्लीतील बुरारी नगर, संतनगर तसेच नागालँड मधील दिमापुर भागात वावरत असल्याचे समोर आले. आरोपी वापर त असलेले सिमकार्ड व मोबाईल नंबर हे वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने असल्याचे तंत्रिक तपासात समोर आले. अखेर पोलिसांनी दिल्ली गाठून आरोपींना बेड्या ठोकल्याच..
   
 असा करायचे गेम..

सदर आरोपी हे अट्टल सायबर गुन्हेगार असल्याचे त्यांच्याकडून जप्त केलेल्या साहित्यावरून दिसून आले आहे. आरोपींकडून पोलिसांनी ॲपल कंपनीचे दोन लॅपटॉप, ३ राउटर, ३ आयफोन व इतर १२ मोबाईल,१५ एटीएम, ३ बँक पासबुक असा एकूण ४ लाख ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय, याशिवाय बँक खात्यातील ४ लाख ५० हजार रुपयांची रक्कम फ्रिज करण्यात आली आहे. आरोपी फेसबुक वरील भारतीय पुरुष व महिलांशी फेसबुक वर बनावट खाते उघडून मैत्री करायचे, प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. आरोपी हे इंटरनेट च्या सहाय्याने वर्चुअल नंबर खरेदी करून विदेशातून बोलत असल्याचे भासवत होते.फेसबुक व व्हॉट्स ॲप च्या माध्यमातून चॅटिंग करून प्रेम व्यक्त करीत गिफ्ट पाठवण्याचा बहाणा करायचे. वेगवेगळ्या राज्यातील व्यक्तींचे मोबाईल, सिमकार्ड, बँक खाते जास्तीचे पैसे देऊन खरेदी करून आरोपी फसवणुकीसाठी त्याचा वापर करायचे.त्यानंतर ज्याला गिफ्ट पाठवले त्याच्याशी बोलतांना आपण विमानतळावरून  कस्टम अधिकारी बोलवत सांगून तुमचे गिफ्ट दिल्ली विमानतळावर आले आहे, त्यामध्ये परदेशी चलन आहे. ते अवैध मार्गाने आले असल्याने कस्टम क्लिअरन्स चार्जेस भरावे लागतील नाहीतर कायदेशीर कारवाई होईल अशी भीती हे नायजेरियन सायबर गुन्हेगार दाखवत होते..या पद्धतीनेच मारीया असल्याचे भासवत नायजेरियन भामट्यांनी मेहकरच्या दिपक जैतकरांना ६२ लाख ६९ हजारांनी चुना लावला... 

यांनी केली कारवाई...

ही कारवाई  पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, सायबर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सारंग नवलकार यांच्या नेतृत्वात सपोनि विलासकुमार सानप, पोहेकॉ ज्ञानेश नागरे, पोना दिपक जाधव, पोकॉ गजानन गोरले, पोकॉ ऋषिकेश खंडेराव यांनी केली. कारवाई यशस्वी करण्यासाठी पोहेकॉ राजू आडवे, पोकॉ कैलास ठोंबरे, पोकॉ अमोल तरमळे यांनी तांत्रिक विश्लेषण करून तपासकामी मदत केली.