किती ही बनवाबनवी!... तुम्‍ही बातमी वाचा, डोक्‍यावर हात मारून म्‍हणाल, कसे कसे लोक फसवू शकतात...!

 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनोळखी गिऱ्हाइकावर विश्वास ठेवणे किराणा दुकानदाराला चांगलेच महागात पडले. भाचीच्या लग्नासाठी किराणा न्यायचाय, तुम्ही सोबत चला, किराणा उतरवल्यानंतर पैसे देतो, असे म्हणत भामट्याने दुकानदाराला कारमध्ये बसवले. काही अंतरावर गेल्यानंतर गाडी थांबवली. साखरेचे पोते दुकानदाराला गाडीतून काढायला लावत एका घराजवळ ठेवायला लावले. मी गाडी पलटून घेतो, असे सांगत तो गेला कायमचाच. ३६ हजार रुपयांचा किराणा घेऊन भामटा फरारी झाला. बुलडाणा शहरातील गोपाळनगर भागातील राजगुरे ले आऊटमध्ये आज, ५ जानेवारी रोजी दुपारी तीनला ही घटना घडली.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, बुलडाणा शहरातील तुळशीनगर भागात प्रमोद ओंकार तायडे यांचे प्रमोद किराणा नावाचे दुकान आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास एक स्विफ्ट डिझायर कारमधून (क्र. एमएच १२ केटी ६९७९) एक गिऱ्हाइक त्‍यांच्‍याकडे आला. औरंगाबादला रेल्वेत नोकरीला आहे.

भाचीच्या लग्नाला आलो. लग्नासाठी किराणा न्यायचाय, असे म्हणत सामानाची यादी त्याने दुकानदार तायडे यांच्याकडे सोपविली. तायडे यांनी संपूर्ण किराणा काढून देत स्विफ्ट डिझायर गाडीत टाकला. तुम्ही सोबत चला. किराणा घरी पोहोचल्यावर तुम्हाला पैसे देतो, असे म्हणत त्या अनोळखी गिऱ्हाइकाने दुकानदार प्रमोद तायडे यांना गाडीत बसवले. गाडी गोपाळनगर राजगुरे ले आऊट भागात गेल्यावर त्या गिऱ्हाइकाने घर आले, असे सांगितले.

एका घरासमोर गाडी थांबवून साखरेचे छोटे पोते दुकानदाराला काढायला लावत घराच्या गेटजवळ ठेवायला लावले. त्यानंतर  मी गाडी पलटून येतो, असे सांगत तो गाडी व किराणा घेऊन पसार झाला. किराणा सामानात काजू, बदाम, तेल, तूप असे ३६ हजार रुपयांचे सामान होते. दुकानदार प्रमोद तायडे यांनी ज्या घरासमोर गाडी थांबली होती तिथे विचारणा केली असता आमच्याकडे कोणतेही लग्न नाही आणि कुणीही किराणा घ्यायला आले नव्हते, असे सांगितल्याने दुकानदाराला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.