बुलडाण्यात गुंडांनी उच्छाद मांडला! मोताळ्याच्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून चौघांनी लुटले!!

 
हाणामारी
बुलडाणा  (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरात गुंडगिरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. २८ डिसेंबरच्या रात्री दोघांना चाकूचा धाक दाखवून तिघांनी लुटल्याची घटना ताजी असताना आणखी एक तशीच घटना समोर आली आहे. राणीबगीच्यात फिरण्यासाठी गेलेल्या मोताळ्याच्या तरुणाला चौघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना काल, ४ डिसेंबरला दुपारी अडीचच्या सुमारास घडली. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून ४ अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलडाणा शहरात सध्या गुंडांच्या टोळ्या हैदोस घालत आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी खमक्या अधिकाराची गरज बुलडाणा शहराला आता भासू लागली आहे. काल दुपारी मोताळा तालुक्यातील निमखेड येथील अक्षय कैलास पवार (२२) हा दवाखान्यात भरती असलेल्या काकांना भेटायला बुलडाण्यात आला होता.

दुपारी अडीचला मित्रांसोबत तो फिरण्यासाठी राणीबगीच्यात गेला होता. लहान मुलांच्या झोक्याजवळ फोटो काढताना तिथे १८ ते २५ वयोगटातील चार जण आले. त्यातील एकाने अक्षयला ५० रुपये मागितले. अक्षयने नकार दिला असता त्यांनी चाकूचा धाक दाखवून त्याला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व बॅगेतील ५०० रुपयांच्या चार नोटा असे दोन हजार काढून ते पसार झाले.

बॅगेतून पैसे काढणारा फुल दाढीवाला, केसाला ब्राऊन रंग लावलेला, अंगात जीन्स व ग्रे कलरचे शर्ट घातलेला तर इतर तिघे उंच व काळ्या रंगाचे होते, असे अक्षयने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेकाँ कैलास जाधव करीत आहेत.