बुलडाण्यात गुंडागर्दी वाढली ; शुल्लक कारणावरून युवकाला मारहाण! शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा..

 
बुलडाणा
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) दिवसेंदिवस बुलडाणा शहरात गुंडागर्दी वाढत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. जिजामाता प्रेक्षागार येथील मैदानात रनिंग करणाऱ्या एका युवकाला चौघांनी बेदम मारहाण केली. तसेच कटरद्वारे जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 ओम गोरखसिंग राजपूत (१७ वर्ष) असे जखमी मुलाचे नाव आहे. तो चैतन्य वाडी परिसरातील रहिवासी आहे. त्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास जिजामाता प्रेक्षागारच्या प्रांगणात तो रनिंग करीत होता. दरम्यान, त्याठिकाणी गोपाल राजु कळसकर 
(रा. एकता नगर) हा उपस्थित होता. त्यावेळी गोपाल म्हणाला की, 'तू माझ्याकडे काय बघतो' आणि गोपालने शिवीगाळ करायला सुरुवात केली. इतकेच नाही तर त्यानी चापटा बुक्क्यांनी मारहाण देखील केली.
     त्यादरम्यान गोपालचे मित्र कौशल वासुदेव आडे, सुदर्शन वासुदेव आडे व विनय सुसर हे सुद्धा तिथे होते. तिघांनी मिळून ओमला मारहाण केली. तितक्यातच गोपाल कळसकरने खिशातून कटर काढले आणि ओमच्या डाव्या डोळ्याच्यावर मारले. हा वार वाचविण्याच्या प्रयत्नात ओमचे डोके फूटले. त्याच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर ओम राजपूत याचा मित्र कुणाल काळे आणि मावसभाऊ सागर विजय मालोद यांनी गोपाळ व इतरांच्या हल्ल्यातून ओमला सोडविले. ओमला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्यात दोन टाके पडले आहेत. असे ओमने तक्रारीत म्हटले आहे. ३ मे, रोजी ओम राजपूत याने वडिलांसह शहर पोलीस ठाणे गाठले आणि सगळी घटना सांगितली. प्रकरणी ओमच्या तक्रारीवरून गोपाल कळसकर, सुदर्शन आडे, कौशल आडे, आणि विनय सुसर अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एएसआय खवले हे करीत आहेत.