मिनीट्रक-ट्रॅव्हल बसची समोरासमोर धडक; ५ जखमी

मोताळा तालुक्‍यातील घटना
 
file photo

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विटा आणायला बुलडाण्याहून मोताळ्याकडे जाणाऱ्या मिनीट्रकला ट्रॅव्हल बस धडकली. यात मिनीट्रकमधील मजूर आणि चालक असे ५ जण जखमी झाले आहेत. ही घटना बुलडाणा - मोताळा रस्त्यावरील वाघजाळ फाट्याजवळ आज, २४ नोव्‍हेंबरला पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.

समीर खान शब्दर खान (३७, रा. शेर ए अली चौक, बुलडाणा), जलील खान अब्दुला खान (४०), शेख वसीम शेख महसूद (२६), शेख महसूद शेख भिखन (४९), नईम खान युसूफ खान (२१,  सर्व रा. राजूर) अशी जखमींची नावे आहेत. त्‍यांना बुलडाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. मिनीट्रक (क्र एमएच ०४ एफजे  ६३९९) मोताळ्याकडे जात होता. त्‍याचवेळी बुलडाण्याकडे मध्यप्रदेशची ट्रॅव्हल बस (क्र. एमपी १३ पी ८५०९) येत होती. दोन्‍ही वाहनांचा वाघजाळ फाट्यावर समोरासमोर अपघात झाला. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  ट्रॅव्हलमधील कुणी जखमी झाले नसल्याचे समजते.