बीबी पोलीस स्टेशन चा हेड कॉन्स्टेबल ज्ञानबा सोसे खादाड निघाला! ३५०० रुपये लाच घेतांना पकडला! बुलडाणा "एसीबी" ची कारवाई...

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा एसीबीच्या (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) वतीने आजपासून जनजागृती सप्ताहाला सुरुवात झाली. ५ नोव्हेंबर पर्यंत हे अभियान चालणार आहे. लाच देऊ नका, घेऊ नका..लाच मागणाऱ्यांची तक्रार करा असे आवाहनच या जनजागृती सप्ताहात करण्यात येत आहे. दरम्यान आज,३० ऑक्टोबरला अभियानाच्या पहिल्याच दिवशी लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर बुलडाणा एसीबीच्या वतीने कारवाईचा फास आवळण्यात आला. बिबी पोलीस ठाण्यातील  पैसेखाऊ पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानबा राजाराम सोसे (४९)  व त्याच्या वतीने लाच स्वीकारणारा पोलीस ठाण्यातील सफाई कर्मचारी विजय फकिरा उबाळे (३५) या दोघांविरुद्ध बिबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एसीबी कडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे यातील तक्रारदार व त्याच्या कुटुंबियांवर कलम ४९८ चा गुन्हा दाखल असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान मा. न्यायालयाने तक्रारदार व त्याच्या कुटुंबियांच्या विरुद्ध जमानती वॉरंट काढले होते. बिबी पोलीस स्टेशनचा हेड कॉन्स्टेबल ज्ञानबा राजाराम सोसे  याने तक्रारदाराला " तुला व तुझ्या कुटुंबीयांची अटक करीत नाही, त्यासाठी ३५ हजार रुपये लागतील" असे म्हणत लाचेची मागणी केली. तडजोडीअंती त्याने ३५०० रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. 

मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्याने बुलडाणा एसीबी कडे तक्रार केली. टीम एसीबी ने तक्रारीची पडताळणी केल्यावर सापळा रचला. ज्ञानबा राजाराम सोसे याने पैसे स्वीकारायचे काम बिबी पोलीस ठाण्यात अंशकालीन सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या विजय उबाळे याला सांगितले होते. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून विजय उबाळे याने ३५०० रुपये स्विकारले, लागलीच एसीबी पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या, त्यानंतर लाचखोर हेड कॉन्स्टेबल सोसे यालाही ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला..

  ही कारवाई एसीबी चे अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक मारोती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक शितल घोगरे व त्यांच्या पथकाने पार पाडली. 

लाच देऊ नका,घेऊ नका..तक्रार करा..

  कुठल्याही शासकीय कामासाठी शासकीय लोकसेवकाने किंवा त्याच्या वतीने कुणी लाचेची मागणी केल्यास संकोच न करता एसीबी कडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी ०७२६२ - २४२५४८ किंवा ९६५७०६६४५५ या क्रमांकावर संपर्क करता येईल. १०६४ हा टोल फ्री क्रमांकही त्यासाठी देण्यात आला आहे.(वृत्तातील फोटो संग्रहित आहे)