Amazon Ad

सासुरवाडीत जाऊन त्याने पत्नीची कापून हत्या केली ; स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न! आता भोगावी लागणार कर्माची फळे! बुलढाण्यातील प्रकरण..

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ती पतीच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाने वैतागलेली.. म्हणून आपल्या सासरी बुलढाण्यात आली.. तरी क्रूर नवऱ्याच्या डोक्यात भलताच काही प्लॅन होता.. त्याने बुलढाण्यात येऊन पत्नीची हत्या केली, हत्या केल्यानंतर दोन्ही मुलींना घेऊन तलावात उडी मारण्यासाठी गेला.. परंतु देव बलवत्तर तलावाकाठी असलेल्या लोकांनी तिघांना वाचवले... ही सगळी घटना २०२१ मध्ये बुलढाण्यात घडली होती. हे सगळं घडवून आणणारा मृतक महिलेचा क्रूर पती गजानन विश्वनाथ जाधव रा. जालना याला आज सोमवार, २० मे रोजी जिल्हा न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 
   सदर घटना त्रिशरण चौकातील स्मशानभुमी नजीक जगदंब नगर येथे घडली होती. ९ ऑगस्ट २०२१ रोजी मृतक पुजा उर्फ गिता ही वडिलांच्या घरी एकटी असतांना तिच्या चारीत्र्यावर संशय घेउन पती गजानन विश्वनाथ जाधव (३५ वर्ष) याने चाकुने सपासप वार करून तिचा खून केला होता. या प्रकरणाची तक्रार पूजाचे वडिल
सुरेश दत्तू तायडे यांनी पोलिसांत दिली. त्यानुसार ते, शहरातील स्मशानभुमी नजीक जगदंबा नगरात राहतात. सन २०११ मध्ये मुलगी पुजा उर्फ गीता हिचे लग्न रितीरिवाजाप्रमाणे गजानन विश्वनाथ जाधव (रा.जालना) याच्यासोबत लावून दिले. लग्नानंतर पूजाला ३ मुली झाल्या. आरोपी गजानन हा नेहमी पत्नी पुजाच्या चारीत्र्यावर संशय घेवून तिला मारहाण करायचा. शारीरिक व मानसिक छळाने पूजा त्रस्त झाली होती. फिर्यादी पुजाचे वडील सुरेश तायडे नेहमी पूजा व आरोपी गजानन यांना समज द्यायचे त्यानंतर पूजाला तिच्या सासरी नांदायला पाठवत होते.
शेवटी गजाननच्या सततच्या त्रासाला कंटाळून पूजा घटनेच्या दीड महिन्याआधी आपल्या दोन मुलींसह माहेरी अर्थात बुलढाण्यात आली होती. त्यांनतर ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता तिचा पती गजानन हा देखील जालन्यावरून बुलढाणा येथे आला. रात्री जेवण करून सासऱ्याच्या घरी मुक्कामी थांबला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी रोजी सकाळी ९ च्या दरम्यान पुजाचे वडील सुरेश तायडे, त्यांची पत्नी व मुलगी अश्वीनी हे बाहेर कामानिमित्त गेले होते. व पुजा उर्फ गीताच्या दोन्ही मुली बाहेर खेळत होत्या त्यावेळी क्रूर गजाननच्या डोक्यात पत्नीचा खून करण्याचा प्लॅन होता. घरात एकटेपणाचा फायदा घेवून गजाननाने पुजावर चाकूने सपासप आठ वार केले. यात ती गंभीरित्या जखमी झाली अखेर तिची निघृणपणे हत्या झाली. इतक्यावरच न थांबता आरोपी गजानन ने बाहेर खेळत असलेल्या आपल्या दोन्ही मुलींना आपल्यासह जिवे मारण्याच्या उद्देशाने उचलून संगम तलाव गाठले आणि उडी घेतली. परंतु दैव बलवत्तर म्हणून तलावावर असलेल्या लोकांनी तिघांचेही प्राण वाचविले . त्यानंतर आरोपी गाजनान स्वतः बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्याने गुन्हयाची कबुली दिली असल्यामुळे संबंधीत पोलीस उपनिरीक्षक गवारगुरू यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत शेजारी लोकांनी मयत पूजा उर्फ गीता हिला सरकारी दवाखाना बुलढाणा येथे नेले असता तीची प्राणज्योत मालवली होती. त्यांनतर उपनिरीक्षक गवारगुरू यांनी तात्काळ घटनास्थळी पंचनामा केला. त्यावेळी दोन रक्ताने भरलेले चाकू व रक्ताचे नमुने मिळाले. त्यानंतर मृतक पूजाचे वडिल वडील सुरेश दत्तू तायडे यांनी बुलढाणा शहर ठाण्यात घटनेची रितसर तकार दाखल केली. त्यानुसार आरोपी गजानन विरोधात भा.द.वि.चे कलम ३०२ व ४९८ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपास अधिकारी गवारगूरू यांनी उर्वरीत गुन्हयाचा तपास करून भा.द.वि.चे कलम ३०२,३०७, ३०९, ३३६, ४९८-अ व आर्म ॲक्टचे कलम ४,२५नुसार वि. न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सदर सत्र खटला पुराव्याकामी लागल्यानंतर आरोपी विरुध्द दोषसिध्द होण्याच्या दुष्टीकोणातुन जिल्हा सरकारी वकील . वसंत लक्ष्मणराव भटकर यांनी १६ साक्षीदार तपासले. त्यापैकी घटनास्थळी शेजारी रहाणा-या साक्षीदार स्वाती चव्हाण, सविता सावंत, दिनकर पवार व संतोष खिल्लारे यांची साक्ष महत्वाची राहिली त्यांनी आरोपीला घटनास्थळावरुन जातांना पाहिले होते. तसेच मृतक व आरोपी गजानन यांची मुलगी श्रुती हिने सुध्दा महत्वाची साक्ष दिली. एकंदरीत घटनास्थळावरुन आढळुन आलेली परिस्थीती व वैदयकीय पुरावे एकत्र असल्याने तसेच आरोपीचे कपड्यावर, व घटनास्थळावरुन जप्त केलेल्या चाकुवर रक्त मिळुन आल्याने तसेच सर्वात महत्वाचे फिंगर प्रिट एक्स्पर्ट यांना एका चाकुवर आरोपीची फिंगरप्रिंट मिळुन आल्यामुळे आरोपी विरुद्ध गुन्हा सिध्द झाला आहे. विशेष बाब म्हणजे सदर सत्र खटल्यामध्ये सर्व साक्षीदाराने सरकार पक्षास मदत केलेली आहे व मृतकाला न्यायदेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
एकंदरीत सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल श्री. वसंत लक्ष्मण भटकर यांनी आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होण्याच्या दृष्टीकोनातून प्रभावी युक्तीवाद केला. त्या अनुषंगाने विदयमान जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ बुलडाणा श्री. एस. बी. डिगे यांनी आरोपी गजानन जाधव यास भादवी कलम ३०२, ३०७, ४९८३, ३०९, ३३६ प्रमाणे व आर्मस ॲक्टचे कलम ४, २५ प्रमाणे दोषी ठरवुन भादवीचे कलम ३०२ नुसार जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, दंड न
भरल्यास सहा महिने अधिकची सक्त मजुरी, भांदवीचे कलम ३०७ नुसार सुध्दा जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तिन महिने अधिकची सक्त मजुरीची शिक्षा, भादवीचे कलम ४९८ अ नुसार तिन वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड, व दंड न भरल्यास एक महिना अधिकची सक्त मजुरीची शिक्षा तर आर्मस ॲक्ट चे कलम ४, २५ नुसार सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अधिकची साध्या कारावासाची शिक्षा अश्याप्रमारे सर्व शिक्षा आरोपीस एकत्रीत भोगावयाचे आहे. तर सदरचा खटला यशस्वी होण्यासाठी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक तपास अधिकारी सुधाकर गवारगुरु, सहायक पोलीस उपनिरीक्षक, फिंगरप्रिंट एक्सपर्ट रामेश्वर गाडवे तसेच कोर्ट पैरवी अधिकारी पो.हे.कॉ. कांबळे यांनी पुर्णपणे सहकार्य केले.