कायमचा काटा काढण्यासाठी रस्त्यात अडवून बेदम मारले: पायाच्या वाट्या चुरा केल्या, डोक्यात घातला रॉड! धामणगाव बढेच्या पोलिसांनी तक्रार घेतली नाही;

म्हणाले,आपसात करा नाहीतर जे करायचं ते करा! आता निवाडा एसपींकडे; मोताळा तालुक्यातील चावर्दा येथील घटना

 
मोताळा
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोठा जमाव जमवून जीवे मारण्याच्या उद्देशाने अमानुष मारहाण केल्याप्रकरणी मोताळा तालुक्यातील चावर्दायेथील शेतकरी संतोष भिका पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांच्या शेजारी तानाजी फरफट, भागवत फरफट, कौशल्याबाई फरफट, शिवाजी फरफट, विनोद फरफट, गंजीधर फरफट, निर्मला फरफट या सात जणांनी संतोष पाटील यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला व गंभीर दुखापत पोहोचवली यामुळे त्यांच्यावर योग्य कारवाई करावी. अशी तक्रार देण्यात आली आहे. काल,२२ मार्चच्या सकाळी ही घटना घडली. सध्या तक्रारदार संतोष पाटील यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धामणगाव बढे पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही, आमची तक्रार घेतली नाही. आपसात करा नाहीतर तुमच्याकडून जे होते ते करून घ्या असे पोलिसांनी म्हटल्याचा आरोप तक्रारदाराच्या मुलाने केला आहे.
  २२ मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास संतोष पाटील हे कामानिमित्त मलकापूरच्या दिशेने निघाले होते. मात्र घरासमोरच तानाजी फरफट याने रस्त्यात ट्रॅक्टर उभे करून त्यांना अडवले. तेव्हा त्याला ट्रॅक्टर मध्येच का उभे केले असे म्हटले असता, त्याने ट्रॅक्टर मधून लोखंडी रॉड काढला आणि संतोष पाटील यांच्या डोक्यावर वार केला, "आता तुझं कायमचा काटाच काढतो" अशी धमकी देखील दिल्याचे संतोष पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. त्याचवेळी त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेले भागवत फरपट, कौशल्याबाई फरपट, शिवाजी फरपट, विनोद फरफट, गंजीधर फरफट, आणि निर्मलाबाई फरपट हे सर्व जण एकत्र जमले. 
त्यांनीदेखील संतोष पाटील यांना अमानुष पद्धतीने मारहाण करायला सुरुवात केली. विनोद, गंजीधर, आणि निर्मलाबाई यांनी संतोष पाटील यांचे केस पकडले, तोंड जमिनीवर दाबले. त्यांच्या पायाच्या दोन्ही वाट्या चुरा केल्या, यावेळी डोक्यातून मोठा रक्तस्त्राव होत होता असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणानंतर संतोष पाटील यांचा मुलगा पवन पाटील, भाऊ वसंत पाटील, अनिल पाटील हे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मारहाण करणाऱ्या सात जणांनी पळ काढला. संतोष पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ते जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा, येथे उपचार घेत आहेत. दरम्यान धामणगाव बढे पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही, आमच्या जीवाला धोका आहे असे तक्रार कर्त्यांनी म्हटले आहे .