जबरदस्ती मंदिरात घेऊन गेला अन्‌ भांगेत भरले कुंकू!; म्‍हणाला, झाले आपले लग्न, आजपासून तू फक्‍त माझी!!; १७ वर्षीय विद्यार्थिनीसोबत नांदुरा तालुक्‍यात घडलेला धक्कादायक प्रकार, युवक अटकेत

 
अपहरण
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोटारसायकलीवर बसली नाही तर एकतर मी आत्‍महत्‍या करतो किंवा तुला तरी मारून टाकतो, अशी धमकी देत १७ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्याशी जबरदस्ती लग्न केल्याचा प्रकार नांदुऱ्यात समोर आला आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलगी नांदुरा तालुक्यातील वडी येथील असून, नांदुरा शहरातील ज्ञानपीठ शाळेत क्लासेससाठी नेहमी येत असे. गावातील राम दयाराम विटोकार हा बसथांब्याजवळ उभा राहून तिचा पाठलाग करून मागे मागे ज्ञानपीठ शाळेपर्यंत यायचा. २३ डिसेंबरला सकाळी ८ वाजता राम विटोकार याने तिचा पाठलाग करून तिला गाठले.

विद्यार्थिनीला म्हणाला, मोटारसायकलवर बसली नाही तर एकतर मी आत्‍महत्‍या करतो किंवा तुला तरी मारून टाकतो. या धमकीमुळे घाबरून विद्यार्थिनी मोटारसायकलवर बसली. त्‍याने तिला आसलगाव येथील मरीमातेच्या मंदिरावर नेले. तिथे राम विटोकारने मंदिरातील कुंकू घेत तिच्या कपाळाला लावून फोटो काढले. म्हणाला की, आता मी तुझ्यासोबत लग्न केले आहेस. तू फक्त माझी आहेस. यावेळी पीडितेने रामच्या पाया पडत मला काही समजत नाही, असे म्हणून मामाला फोन करून आसलगाव येथे बोलावले.

यावेळी मुलीचा मामा मंदिराजवळ आला असता राम विटोकार मामाला सुध्दा आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे भीतीपोटी मामा तेथून निघून गेला. त्यानंतर रामने तिला दुचाकीवर बसवून नांदुरा येथे सोडून दिले, अशी तक्रार तिने ६ जानेवारीला नांदुरा पोलीस ठाण्यात दिली. नांदुरा पोलिसांनी रामविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्‍याला अटक केली असून, तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी करत आहेत.