शेतात बकऱ्या घुसल्या म्हणून केली होती कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण! जातीवरून शिवीगाळही केली होती; रायपुरच्या दोघांना न्यायालयाने घडवली अद्दल! काय आहे शिक्षा जाणून घ्या..

 
Police station
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): 
शेतात बकऱ्या घुसून तूर खाल्ल्याच्या कारणातून वाद घालून जातीवाचक शिवीगाळ करीत कुऱ्हाडीच्या दांड्याने मारून जखमी केल्याप्रकरणी आरोपींना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश- २ एस. बी. डीगे यांनी ९ ऑगस्ट रोजी दिला. रायपूर शिवारात ११ जानेवारी २०२१ रोजी ही घटना घडली होती.
 तक्रारदार महिला व तिचे पती शेतात काम करत असताना तुमच्या बकऱ्या शेतात शिरून आमच्या शेतातील तूर खाल्ली, या कारणातून वाद घालून हरिभाऊ रामोजी जाधव व लताबाई संपत खंडागळे यांनी तक्रारदार, तक्रारदाराचे पती व मुलाला मारून जखमी केले होते. शिवाय जातीवरून शिवीगाळ देखील केल्याचा आरोप रायपूर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत करण्यात आला होता.या प्रकरणी विविध कलमासह गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले होते. 
न्यायालयात जिल्हा सरकारी वकील भटकर यांनी एकूण दहा साक्षीदार तपासले. त्यापैकी तक्रारदार महिला, तिचे पती, वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या आधारे झालेल्या युक्तिवादातून विद्यमान न्यायाधीश एस. बी. डीगे यांनी आरोपी हरिभाऊ रामोजी जाधव याला दोन वर्ष सक्त मजुरी व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली तर लताबाई खंडागळे यांची चांगल्या वर्तणुकीच्या करारनाम्यावर सुटका करण्यात आली.