चोरी केली, पण दुकानदाराला समजूही दिले नाही! जानेफळमध्ये दोन महिलांनी "असा" मारला जनरल स्टोअरवर डल्ला.. बातमीत पहा व्हिडिओ

 
मेहकर(अनिल मंजुळकर : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मेहकर तालुक्यातील जानेफळ मध्ये काल ३ जुलैच्या रात्री एका जनरल स्टोअरमधून दोन महिलांनी शाळेच्या वह्या लंपास केल्या. रात्री ८ वाजेची ही घटना असून संपूर्ण प्रकार दुकाना बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
 
जानेफळ शहरातील मार्केट लाईन परिसरात अनिल घायवट यांचे जनरल स्टोअरचे दुकान आहे. शाळा उघडल्या असल्याने दुकानात विद्यार्थ्यांसाठी लागणारे शाळेचे साहित्य देखील उपलब्ध आहे. वर्दळीच्या ठिकाणी असणारे हे दुकान पाहून दोन बुरखा वेष परिधान केलेल्या महिला दुकानासमोर आल्या. एकीने इतर साहित्य दाखवा म्हणत दुकानदार मुलाला हुलकावणी दिली. तर दुसरीने काउंटरवर ठेवण्यात आलेल्या वह्या लंपास केल्या. प्राप्त माहितीनुसार, रात्री दुकान बंद करण्याच्या आधी ही घटना घडली. महिलांनी दुकानातील दप्तर सुद्धा तपासले. इतर साहित्य दाखवण्याच्या नावाखाली दुकानदार मुलाला गुंतवून काउंटरवरील साहित्य महिलांनी चोरी केल्याचे दिसून आले. दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. यामुळे हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला. वर्दळ आणि गजबजलेल्या ठिकाणी चोरी झाल्याने अशा चोरट्यांना पोलिसांचा वचक राहिला नाही काय? असा सवाल उपस्थित होतो. वृत्त लिहीपर्यंत अज्ञात चोरट्या महिलां विरोधात तक्रार दिलेली नाही.