पायावर सपासप काड्या मारल्या अन् म्हणाले 'परत शेतात आला, तर जिवंत जावू देणार नाही ! दोघांविरोधात गुन्हा, माळविहीरची घटना..
Jun 19, 2024, 09:20 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मित्राला शेत दाखवण्यासाठी आलेल्या इंजिनीयरला दोघांनी मारहाण केली. परत शेतात आला तर, जिवंत जावू देणार नाही अशी धमकी दिली. माळविहीर शिवारात १७ जूनच्या संध्याकाळी ही घटना घडली. प्रकरणी, तक्रारीवरून पोलिसांनी माळविहीरच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत प्रवर अजय मिश्रा (२२ वर्ष) रा. विष्णूवाडी बुलडाणा यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, आई कल्पना अजय मिश्रा यांचे नावाने माळविहीर शिवारात शेती आहे. दरम्यान, १७ जून रोजी प्रवर मिश्रा याने मित्राला शेत दाखवण्यासाठी माळविहीर येथील शेतात आणले. त्यावेळी पोखरी ते येळगाव रस्त्यावर उभे राहून दोघे शेत बघत होते. दरम्यान, ज्ञानेश्वर गायकी हा तिथे आला आणि प्रवर मिश्रा याला म्हणाला की, तू इथे कशाला आला? तुला यापूर्वी सुद्धा सांगितले होते की या ठिकाणी यायचे नाही. निषेत आमची आहे शेताबाबत प्रकरण कोर्टात चालू आहे असे म्हणत ज्ञानेश्वर गायकी यांनी प्रवरला शिवीगाळ केली. व डोक्यात सपाट मारली. इतकेच नाही तर, रोडच्या बाजूने खाली पडलेली काठी उचलून त्याच्या डाव्या पायाच्या पोटरीवर मारली. ज्ञानेश्वर गायकी सोबत त्याचा भाऊ योगेश देखील आला होता.
त्याने ज्ञानेश्वरच्या हातातील काठी घेऊन प्रवरच्या पायावर मारली. परत जर आला तर जिवंत जाऊ देणार नाही असे दोघांनी प्रवरला धमकावले. तसेच त्याच्या मित्राच्या गाडीला समोर दगड मारून नुकसान केले. असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर प्रवर मिश्रा याने बुलढाणा शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी, ज्ञानेश्वर गायकी आणि योगेश गायकी रा. माळविहीर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुभाष मस्के करीत आहेत.