महिलेच्या गळ्यातील चैनीला लावला रंग, नंतर स्वच्छ करून देतो म्हणत घरात शिरला अन्...! लोणार शहरातील एका महिलेसोबत विचित्र घटना घडली...

 
Ghji
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) लोणार शहरातील एका महिलेसोबत एक विचित्र प्रकार घडला आहे.  सेल्समन असल्याचे सांगून भांडी स्वच्छ करण्याची पावडर विक्रेत्याने महिलेला चांगलाच गंडा घातला. आधी गळ्यातील चैनीला रंग लावला नंतर साफ करून देतो असे म्हणत तो घरात शिरला, त्याच्यामागे पुन्हा एक जण घरात आला. आणि   स्वच्छ करून देण्याच्या नावाने  दोघा अज्ञातांनी ३  तोळ्याची, ६७ हजार रुपयांची सोन्याची चैन लंपास केली. अश्या प्रकारे  फसवणूक केल्याची तक्रार महिलेने लोणार शहर पोलीस ठाण्यात  मंगळवारी दिली आहे.

  सुशीला संचेती असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. सोमवारी ८ एप्रिल रोजी, दुपारी  १:३० वाजेच्या सुमारास त्या घरासमोर बसल्या होत्या. तितक्यात एक अनोळखी व्यक्ती समोर आला आणि भांडी धुण्याची पावडर विकत घ्या असे म्हणाला. परंतु त्यांनी नकार दिला. कंपनीचे प्रॉडक्ट आहे आम्ही सेल्समन आहोत,  असे म्हणत त्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील  चैनीला हात लावत रंग लावला, रंग का लावला असे विचारले असता, साफ करून देतो असे त्याने म्हटले. आणि घरात शिरला..त्यावेळी त्याच्या पाठीमागून त्याचाच एक सहकारी सुद्धा दहा ते पंधरा मिनिटांनी घरात आला होता.

"तुम्हाला डेमो करून दाखवतो,रंग लावलेली चैन कशी चमकते तुम्ही बघाच"  असं म्हणून त्याने एका पातेल्यात चैन टाकायला लावली. त्यामध्ये पाणी व हळद टाकून पाणी गरम करायचे सांगितले, यावेळी घरामध्ये फिर्यादी सुशीला संचेती यांच्यासह त्यांची सून प्रीती ह्या देखील उपस्थित होत्या. दोघींच्या डोळ्यासमोर तीन तोळे सोन्याची चैन पातेल्यात टाकण्यात आली. पाणी थोडे गरम आहे, थोड्यावेळाने त्यामधून चैन काढा असे सांगून दोघेजण घराबाहेर पडले. इकडे  सासू सुनेला काहीही समजलं नव्हतं. थोड्यावेळाने पातेल्यात हात टाकून चैन पहिली तर त्यांना दिसून आली नाही.  यावेळी आपली तीन तोळे सोन्याची चैन, ६७ हजार रुपयांची लंपास झाल्याचे त्यांना लक्षात आल्यांनतर दोघी घराबाहेर येऊन गल्लीत त्या दोघा व्यक्तींचा शोध घेऊ लागल्या, परंतु ते कुठेही आढळले नाही. अशा पद्धतीने दोघा आज्ञातांनी  फसवणूक केल्याची तक्रार सुशीला संचेती यांनी लोणार शहर पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.