कायद्याला जुमानत नव्हता, स्वतःला समजत होता शेर..! पोलिस सव्वाशेर निघाले; खामगावच्या ऋतिकचा केला करेक्ट कार्यक्रम....

 
खामगांव
खामगांव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शहरातील ऋतिक इंगळे(वय२२ वर्ष) ह्या युवकावर मागील पाच वर्षात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा पोलिसांनी केली होती मात्र तरी त्याच्या गुन्हेगारी वृत्तीला आळा बसला नाही, वारंवार कारवाई करून सुद्धा त्याचा वागणुकीत बदल झाला नसल्यामुळे त्याला एका वर्षासाठी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. 
ऋतिक इंगळे हा खामगावतील कोठारी फैलातील रहिवासी आहे. त्याच्यावर मागील पाच वर्षात विविध गुन्हे दाखल झाले, त्यामध्ये विनयभंग, अवैधरित्या शस्त्र बाळगणे,मारामारी करणे, चोरी अश्या गुन्ह्याचा समावेश आहे. दरम्यानच्या काळात पोलिसांनी त्याच्यावर कारवाईही केली. मात्र तरी तो जुमानला नाही, तो हातभट्टीवाला असल्याचा पोलिसांना खात्री झाली.त्यांनतर पोलिसांनी त्याला स्थानबद्ध करण्यात यावे, ह्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यांनतर दंडाधिकारी यांनी प्रस्ताव मान्य करत, त्याला एका वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन काल २४ जानेवारीला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने , अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, स्ता. गू.शा चे निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात खामगाव शहरचे तत्कालीन ठाणेदार नरेंद्र ठाकरे, अंमलदार,हेड कॉन्स्टेबल अरुण हेलोडे, कॉन्स्टेबल राम धामोडे यांनी केली.