हद कर दी...एकाच दिवसात ६ बेपत्ता!; ४ तरुणी, १ तरुण, एक वृद्धेचा समावेश

टायपिंगला जाते सांगून बुलडाण्यातून २० वर्षीय तरुणी बेपत्ता; बाजारात आलेली ३० वर्षीय विवाहिता शेगावमधून बेपत्ता!
 
missing
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात काल, १६ नोव्‍हेंबरला एकाच दिवसात तब्‍बल ६ जण बेपत्ता झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे.

बुलडाण्यातून तरुणी गायब
टायपिंगला जातेय असे सांगून घरातून बाहेर पडलेली २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. बुलडाणा शहरात ही घटना उघडकीस आली असून, तिच्या वडिलांनी या प्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. काल, १६ नोव्‍हेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास सावित्रीबाई फुलेनगरात ही घटना घडली.
कु. काजल गौतम आराख असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव असून, तिचे वडील गौतम पिराजी आराख (५१) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी शोध सुरू केला. नातेवाइकांकडे, मैत्रिणींकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही. त्‍यामुळे पोलीस ठाण्यात गाठण्यात आले. तिचे वर्णन असे ः रंग सावळा, उंची ५ फूट, बांधा मध्यम, अंगात पोपटी टॉप, काळी लेगिग्ज, काळी चप्पल. ती कुणाला आढळल्यास शहर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तपास पोहेकाँ कैलास जाधव करत आहेत.

शेगावमधूनही विवाहिता बेपत्ता
सामान घेण्यासाठी शेगावच्या बाजारात आलेली ३० वर्षीय विवाहिता गायब झाल्याची घटना काल, १६ नोव्‍हेंबरला समोर आली. तिच्या पतीने शेगाव शहर पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी नोंद घेऊन शोध सुरू केला आहे. गौतम भीमराव शेगोकार (३८, रा. भोनगाव ता. शेगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली.  सौ. रिना गौतम शेगोकार (रा. भोनगाव) असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे. ती शेगावच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काल दुपारी अडीचच्या सुमारास गायब झाली. तपास पोहेकाँ गजेंद्र रोहनकार करत आहेत. विवाहितेचे वर्णन असे ः  रंग सावळा, बांधा  मध्यम, उंची ५ फूट, अंगावर हिरवी साडी, पिवळे ब्लाऊज, सोबत पर्स. पत्‍नी व मुलांसह गौतम शेगोकार चिंचोली येथून सामान घेण्यासाठी शेगावला आले होते. पत्‍नी कोणालाही काही न सांगता कुठेतरी निघून गेली. तिचा सगळीकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही, असे तक्रारीत पतीने म्‍हटले आहे.

अन्य बेपत्ता...
लोणार येथून सौ. नवलाबाई शेषराव कांगणे (५२, पोलीस ठाणे लोणार), भाग्यश्री गजानन घुले (१९, गौलखेड, पोलीस ठाणे मलकापूर ग्रामीण), तेजस्विनी संदीप उमरकार (१८, टुनकी बुद्रूक, पोलीस ठाणे सोनाळा), मनिषा सागर तायडे (१९, निमखेड, पोलीस ठाणे बोराखेडी), तेजस प्रतापराव आखाडे (१८, डोणगाव, पोलीस ठाणे डोणगाव).