गुरुजी तुम्‍हीसुद्धा... खोट्या कागदपत्रांनी मिळवले कर्ज!; तोरणा पतसंस्थेची फसवणूक, बुलडाण्यात गुन्हा दाखल

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खोटे व बनावट कागदपत्र देऊन सहायक शिक्षकाने तोरणा महिला अर्बन पतसंस्थेच्या बुलडाणा शाखेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतसंस्थेच्या वसुली अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वसंत नथ्थू सुतार (रा. बोरखेडी, ता. देऊळगाव राजा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

"तोरणा'चे वसुली अधिकारी मदन कोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, स्व. बबनराव देशपांडे विद्यालय, मोताळा येथे सहायक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले वसंत सुतार यांनी बुलडाणा शाखेकडे पगार योजनेवर दीड लाख रुपये कर्जाची मागणी केली होती. पतसंस्थेने कागदपत्रे मागितली असता त्यात पगारातून हप्ता कपात करण्याचे मुख्याध्यापकाचे हमीपत्र सुतार यांनी दिले.

१ मे २०१७ रोजी पतसंस्थेने त्यांना दीड लाख रुपये कर्ज दिले. मात्र त्यानंतर सुतार यांच्या पगारातून हफ्ता कपात होत नसल्याने पतसंस्थेने त्यांना विचारणा केली. त्यावर तांत्रिक अडचण आहे. लवकरच जमा होईल, असे उत्तर दिले. मात्र तरीही हप्ता जमा न झाल्याने पतसंस्थेने याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र देऊन दरमहा हप्ता कपात करून पाठविण्यास सांगितले. मात्र २०१७ मध्ये मुख्याध्यापकांनी कोणतेही हमीपत्र सुतार यांना दिले नाही व त्यावर सही केली नसल्याचे कळवले.

शिवाय हमीपत्रावर मुख्याध्यापक म्हणून ज्यांची सही व शिक्का आहे ते दादाराव भाऊराव साळवे हे मे २०१६ मध्येच सेवानिवृत्त झाल्याचे कळविले. त्यामुळे पगार कपात करण्याचे हमीपत्र शाळेने दिलेले नसल्याचे पतसंस्थेला कळविण्यात आले. पतसंस्थेने याबाबत कर्जदार सुतार यांना जाब विचारला असता एका महिन्यात कर्ज भरतो, असे उत्तर दिले. मात्र सुतार यांनी कर्जभरणा केला नाही. सुतार यांनी बनावट कागदपत्रे व मुख्याध्यापकांची खोटी सही व खोटे शिक्के मारून कागदपत्रे खरे असल्याचे भासवून संस्थेची फसवणुक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी वसंत सुतार याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक जयसिंग पाटील करीत आहेत.