१७ कोटींचा GST बुडवला!; खामगावच्या दुर्गाशक्ती फुड्सविरुद्ध कारवाई

 
File Photo
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्राहकांकडून जमा केलेला जीएसटी कर वर्षानुवर्षे शासनाच्या तिजोरीत जमा न करता खामगाव येथील दुर्गाशक्ती फूड्स प्रा.लि.चे संचालक शशिकांत सुरेका यांनी शासनाची १७ कोटी रुपयांची फसवणूक केली. अफरातफर आणि शासकीय रकमेच्या करचुकवेगिरी प्रकरणी खामगाव येथील शिवाजीनगर पोलिसांनी काल, १० नोव्हेंबर रोजी या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वस्तू व सेवा कर कायदा २०१७ नुसार अमरावती विभागातील हा पहिलाच गुन्हा असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. खामगाव येथील दुर्गाशक्ती फूड्सचे संचालक शशिकांत फकीरचंद सुरेका यांनी ग्राहकांकडून जमा केलेला जीएसटी वर्षानुवर्षे शासकीय तिजोरीत जमा केला नाही. त्यामुळे वस्तू व सेवा कर विभागाने आदेश पारित करत अमरावती विभागीय आयुक्त टी. के. पाचरणे यांच्या आदेशाने खामगाव येथील सहाय्यक आयुक्त डॉ. चेतनसिंह राजपूत यांनी काल शिवाजीनगर पोलीस तक्रार दिली. एकूण १६ कोटी ५९ लाख २ हजार ९७७ एवढा जीएसटी सुरेका यांनी जमा न करता शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.