गॅस "भारत'चा... पदार्थ चायनिज!; मलकापूर पोलीस म्‍हणाले, हे नाही चालणार!!

 
file photo
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरगुती गॅसचा वापर चायनिज सेंटर चालविण्यासाठी करणाऱ्याविरुद्ध मलकापूर शहरात कारवाई करण्यात आली आहे. ईश्वर राजू सारापुरे (२४, रा. हनुमाननगर, मलकापूर) असे कारवाई झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून, तो बुलडाणा रोडवर ईश्वर चायनिज सेंटर चालवतो. ही कारवाई ३१ डिसेंबरला रात्री करण्यात आली. त्‍याच्याविरुद्ध पोलीस उपनिरिक्षक गोपाल प्रेमदास राठोड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरिक्षक श्री. राठोड हे पोकाँ संतोष निवाडकर, आनंद माने, पोकाँ  सुनिल नाफडे यांच्यासह खासगी वाहनाने मलकापूर शहरात पेट्रोलिंग करत होते. त्‍यांना रात्री साडेदहाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की ईश्वर चायनिज सेंटरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जात आहे. पथकाने तातडीने त्‍या ठिकाणी धाव घेऊन तपासणी केली असता ईश्वर तारापुरे हा घरगुती वापरातील गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिकरित्या करत होता.

घरगुती गॅस सिलिंडरला जोडलेल्या गॅस भट्टीवर चायनिज पदार्थ तयार करून विकताना तो दिसला. पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेतले. त्‍याच्याकडून भारत गॅस लिहिलेले सिलिंडरसह एकूण ८ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने घरगुती गॅस व्यवसायासाठी वापरणाऱ्यांत खळबळ उडाली आहे. यापुढे अशा पद्धतीने घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा फास आवळणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.