'समृद्धी'वरील चोरट्यांची टोळी पकडली! गाडी आडवी लावून लुटले होते! बुलडाणा एलसिबीची दमदार कामगिरी; ६ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत!

 
ghj

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  सुसाट वेग आणि अपघाती सत्रामुळे समृध्दी महामार्ग चर्चेचा विषय बनला आहे. अलिकडे याच महामार्गावर वाहनांना अडवून जबरी चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी तपाचके गतीमान करुन समृध्दीवर वाहनधारकांची लुट करणाऱ्या टोळीला गजाआड केले. नव्हे तर त्यांच्या ताब्यातून ६ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. उमरखेड (ता. भोकरदन जि. जालना) येथील बाबुराव गणेश फुके हे २४ ऑगस्टच्या सकाळी २ वाजता त्यांच्या वाहनाने समृध्दी महामार्गाने छत्रपती संभाजी नगरकडे जात असतांना मेहकर टोल नाक्याचे नजीक चॅनल नंबर २८२ जवळ अज्ञात तिघांनी स्विफ्ट डिझायर वाहनातून पाठीमागून आले आणि फुके यांच्या वाहनासमोर गाडी आडवी लावली. फुके यांना वाहनाच्या बाहेर काढून, त्यांना जिवे मारण्याची धमकी देवून त्यांचे जवळील नगदी १ लाख २० हजार रुपये व एक मोबाईल, असा एकूण १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला.

या प्रकरणी बाबुराव फुके यांच्या फिर्यादीवरुन मेहकर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुध्द भादंविचे कलम ३९२,३४१, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. उपरोक्त जबरी चोरीच्या गुन्ह्यांची दखल घेवून पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी. बी. महामुनी यांनी गुन्ह्याची त्वरीत उकल करणेबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने स्थागुशाचे पोनि अशोक लांडे यांनी त्यांच्या अधिनस्त सपोनि विलासकुमार सानप, पोउपनि श्रीकांत जिंदमवार, सचिन कानडे, पोलीस अंमलदार दिपक लेकुरवाळे, दिनेश बकाले, शरद गिरी, गणेश पाटील, पुरूषोत्तम आघाव, अनंत फरताळे, गजानन गोरले, अमोल शेजोळ, गणेश शेळके, मनोज खरडे, दिपक वायाळ, शिवानंद मुंढे, सुरेश भिसे, विलास भोसले व मेहकर पोलीस स्टेशनचे सपोनि शरद आहेर, पोलीस अंमलदार करीम शहा यांची वेगवेगळी स्वतंत्र तपास पथके तयार करुन, त्यांना गुन्ह्याची उकल करून आरोपीतांचा शोध घेण्याच्या सुचना केल्या होत्या.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती तसेच गुन्ह्याचा केलेला तांत्रीक तपास केला असता, गुन्ह्यामध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील आरोपीतांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे समजले. त्यामुळे आरोपी गजानन भगवान जाधव (वय २२) रा. भिवंपूर (ता. भोकरदन, जि. जालना), अनिल पवार (रा. तिसगांव ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांना जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथून अटक करुन विचारपूस केली असता, त्यांनी उपरोक्त गुन्ह्यासह आणखी एका गुन्ह्याची कुबली दिली. तसेच त्यांच्या सोबत राजेश सुरेश गवळी (वय ३६) रा. छपन्ननगर, मुकुंदवाडी ता. जि. संभाजीनगर याचाही सहभाग असल्याचे सांगितले. त्यामुळे पथकाने उपरोक्त आरोपीच्याही मुसक्या आवळल्या. आरोपींच्या ताब्यातून १४ नग मोबाईल, स्विफ्ट डिझायर वाहन, ३५ हजार रुपये रोख, चांदीचे दागीने, असा एकूण ६ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल. त्यांच्याकडून ईतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.