तरुणाची आत्‍महत्‍या अनैतिक संबंधातून!; विवाहितेच्या पतीने दिली होती काटा काढण्याची धमकी!!

 
murder
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अमडापूर येथील आकाश सुरेश गवई (२५) या तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या व कुजलेल्या अवस्थेत २ जानेवारीला खामगाव तालुक्यातील नागझरी बुद्रूक शिवारात आढळला होता. याप्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सुरुवातीला ही हत्या आहे की आत्महत्या, अशी चर्चा सुरू होती. मात्र काल, ९ जानेवारी रोजी आकाशच्या आईने हिवरखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आकाशची हत्या नसून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे समोर आले आहे. वैरागड (ता. चिखली) येथील एका विवाहितेसोबत आकाशचे प्रेमसंबध होते. मात्र तिच्या नवऱ्याला माहीत झाल्याने त्याने आकाशला काटा काढण्याची धमकी दिली होती. त्यामुळेच आकाशने आत्महत्या केली, असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून वैरागड येथील विष्णू रामा मिसाळ (३०) आणि सावित्री विष्णू रसाळ (२२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाशची आई शालिनी सुरेश गवई (४८, रा. अमडापूर) यांनी याप्रकरणाची तक्रार दिली. आकाश हा खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकवर चालक म्हणून काम करत होता. आकाशचे वैरागड येथील सावित्रीशी प्रेमसंबंध होते. दोघे मोबाइलवर एकमेकांसोबत बोलत होते. या संबंधाची माहिती सावित्रीचा पती विष्णूला मिळाली होती. त्यामुळे विष्णूने आकाशला शिविगाळ केली होती व एखाद्या दिवशी तुझा काटाच काढतो, अशी धमकी दिली होती. सावित्रीने सुद्धा आकाशला शिविगाळ केली होती. त्यामुळे तणावात असलेल्या आकाशने आत्महत्या केली होती. दोघा पती-पत्नीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण तपासासाठी अमडापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.