शेगावमधील लॉजवर विधवेवर वारंवार लैंगिक अत्‍याचार!; लग्नाचे आमिष दाखवले, पैसेही घेतले...!!

 
rape
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगावमधील लॉजवर नेऊन ३६ वर्षीय विधवेवर वारंवार लैंगिक अत्‍याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शेगाव शहर पोलिसांनी आज, १२ जानेवारीला पीडितेच्या तक्रारीवरून ४० वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ं

रमेश गजानन इंगळे (रा. आलेगाव, ता. पातूर, जि. अकोला) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. पीडित महिला त्‍याच्‍याच गावात राहते. दोघांची ओळख आहे. तिचे पती २०१७ साली वारले आहेत. ओळखीमुळे त्‍यांचे एकमेकांच्या घरी येणे- जाणे होते. सरकारी कागदपत्रांचे काम करून देऊन त्‍याने तिचा विश्वास जिंकला. तिच्यासोबत जवळीक साधली. २०१९ च्या जानेवारी महिन्यात दोघे शेगावला आले होते.

लॉजवर नेऊन रमेशने तिला तुझ्याशी लग्न करतो, असे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्‍थापित केले. त्याच्या सांगण्याप्रमाणे तिने शेती विकली व गावातील बुलडाणा अर्बन बँकेत ठेवलेली तिची एफडीही मोडली. रमेशने तिच्याकडून वारंवार पैसे घेतले. ते पैसे नंतर परत केलेच नाही. तिच्याच पैशाने दोघे अनेकदा शेगावला आले आणि लॉजवर थांबले. तिथे त्‍याने अनेकवेळा तिच्याशी इच्‍छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. लग्नही केले नाही आणि पैसे परत केले नाही. त्‍यामुळे फसवणूक झाल्याची जाणीव झाल्याने पीडितेने शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. डांगे करत आहेत.