डोंगरावर फिरायला गेले होते ४ तरुण, अचानक वीज कोसळली! एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी! जळगाव जामोद तालुक्यातील घटना; जयश्रीताई शेळकेंनी घेतली आपदग्रस्त कुटुंबाची भेट..

 
kdfjddj

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद तालुक्यातील सोनबर्डी येथील ज्ञानेश्वर भारत यादव(२१) या युवकाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना २० जुलै रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके यांनी आज,२१ जुलै रोजी सकाळी या दुःखद प्रसंगी आपद्ग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच या घटनेत जखमी झालेल्या युवकांची विचारपूस केली.

सोनबर्डी येथील चार युवक २० जुलै रोजी दुपारी डोंगरावर फिरायला गेले होते. अशात ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटात जोराचा पाऊस सुरु झाला. अचानक अंगावर वीज पडून ज्ञानेश्वर भारत यादव (२१) याचा जागीच मृत्यू झाला. तर आकाश तुकाराम जामुनकर (२५), निखिल देविदास यादव (१६) जयेश कैलास बारेला (२०) जखमी झाले. 

या घटनेत २१ वर्षीय ज्ञानेश्वर यादव या युवकाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके यांनी या दुःखद प्रसंगी भेट देऊन मृताच्या कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच जखमींची विचारपूस केली. यावेळी सोनबर्डीचे सरपंच रामलाल, कॉंग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सहकार सेलचे उपाध्यक्ष एम. आसिफ इकबाल, जळगाव जामोदचे शहराध्यक्ष अर्जुन घोलप, संतोष बावस्कर, मनोज वाघ, गजानन अवचार, महादेव पुंडे, शब्बीर शाह आदींची उपस्थिती होती.