आधी सीसीटीव्‍हीची वायरिंग तोडली, मग दीड लाखाच्या सोयाबीनवर मारला डल्ला!

सोबत DVR ही नेला!!; चिखली तालुक्‍यातील घटना
 
सोयाबीन
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली एमआयडीसीतील साइराम ट्रेडींग आडत दुकानाचे गोदाम फोडून चोरट्यांनी ४० क्विंटल सोयाबीन चोरून नेले. २ जानेवारीला सकाळी ही घटना समोर आली. दुकानमालक बालाजी ठेंग यांनी चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिखली बाजार समितीत साईराम ट्रेडींग नावाने ठेंग यांचे आडत दुकान आहे. एमआयडीसीत या दुकानाचे गोदाम आहे. २ जानेवारीला सकाळी गोदामावरील धनंजय देशमुख यांनी फोन करून ठेंग यांना सांगितले, की गोदामाचे शटर वाकवून दोन अडीच फूट उचललेले दिसत आहे. त्‍यामुळे ठेंग यांनी तातडीने गोदाम गाठले. मालाची पाहणी केली असता सोयाबीनचे ४० पोते (वजन ४० क्विंटल) गायब होते.  सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायरिंग तोडली होती. १ लाख ४४ हजार रुपयांची सोयाबीन चोरट्यांनी चोरून नेली होती. सोबत सीसीटीव्‍ही कॅमेऱ्याचा २ हजार रुपयांचा डीव्‍हीआरही नेला. सीसीटीव्ही यंत्रणेची वायरिंग तोडून ४ हजार रुपयांचे नुकसान केले.