जिल्ह्यात फक्‍त "या' दोन तासांतच फोडता येतील फटाके!; पोलिसांकडून निर्बंध

एसपी अरविंद चावरिया दिवाळीच्या शुभेच्‍छा देताना म्‍हणाले...
 
 
File Photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः कोरोनामुळे लावलेले निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी तिसरी लाट येऊ नये यासाठी अद्यापही काही निर्बंधांचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे. त्‍यामुळे दिवाळीत फटाके फोडतानाही निर्बंधांचे पालन करावे लागणार असल्याची सूचना जिल्ह्याच्या पोलीस विभागाने केली आहे. रात्री ८ ते १० या दोन तासांतच फटाके फोडण्याची मुभा देण्यात आली आहे. या नियमाचा भंग केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दिवाळी सणाला लहान मोठे सारेच फटाके फोडण्यासाठी उत्‍साही असतात. आतषबाजी केली जाते. मात्र, फोडण्यात येणारे काही फटाके अत्यंत घातक असतात. या फटाक्यांमुळे हवेचे प्रदूषण होऊन स्फोटक आवाजामुळे नागरिकांना त्रास होतो. अनेकांना कान, नाक, डोळ्यांचे विविध आजारही होण्याची शक्यता असते. लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांनासुद्धा फटाक्यांचा प्रचंड त्रास होतो. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने पोलीस विभागानेही दिवाळीसाठी काही निर्बंध लागू केले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, शहर व ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था, रुग्णालय, धार्मिकस्थळे, न्यायालय, नर्सिंग होम या परिसरांच्या शंभर मीटर अंतराच्या आत फटाके फोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

फटाके विक्रेत्यांनासुद्धा सूचना...
न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस विभागाने फटाके विक्रेत्यांना सुद्धा मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांनी निर्धारित करून दिलेल्या ठिकाणीच  विक्रेत्यांनी दुकाने लावावी. दोन दुकानांमध्ये ३ मीटरपेक्षा कमी अंतर ठेवू नये. कुठल्याही सुरक्षित घोषित केलेल्या सीमेपासून ५० मीटरपर्यंत दुकान नसावे. १२५ डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांची विक्री करू नये. अशा सूचना फटाका विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत.

खरेदीला जाताना ही घ्या काळजी...
बाजारात खरेदीसाठी जाताना अंगावरील सोने, मौल्यवान वस्तू झाकून ठेवाव्यात. सोनसाखळी चोरांपासून सावध रहावे. एटीएम व बँकेतून पैसे काढतेवेळी जवळपास कोणी संशयित आहे का, यावर लक्ष ठेवावे. वयस्क नागरिकांनी पैसे काढण्यासाठी एटीएमवरील सुरक्षारक्षक किंवा जवळच्या नातेवाइकांची मदत घ्यावी. बाजारात खासगी वाहन घेऊन गेल्यास सुरक्षित ठिकाणी व हँडल लॉक करूनच पार्क करावे. सीसीटीव्ही कॅमेरे ज्या ठिकाणी आहेत, अशा ठिकाणी मोटारसायकल पार्क करावी. वाहनात मौल्यवान वस्तू ठेवू नये अशा सूचनाही पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.

नागरिकांनी आरोग्यास घातक व प्रचंड आवाज होणारे फटाके फोडण्याचे टाळावे. प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यावर भर द्यावा. दिवाळी साजरी करताना नागरिकांच्या हितासाठी न्यायालयाने व पोलीस विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. सर्व जिल्हावासीयांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!
- अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलडाणा