चिखली तालुक्यात आगलावे वाढले! रामनगरच्या शेतकऱ्याची प्रगती डोळ्यात खुपली, भामट्याने साडेचार एकरातील सोयाबीनची सुडी जाळून टाकली; मध्यरात्रीची घटना...

 

चिखली( गणेश धुंदळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील मेरा बु शिवारात मध्यरात्री थरार घडला.. रामनगर येथील दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सुड्या आगलाव्या भामट्यांनी पेटवून दिल्या..

दरवर्षी सोयाबीन सोंगुन सुड्या लागल्यावर काही जळके भामटे सक्रिय होतात. या जळक्यांना स्वतः कष्ट करता येत नाहीत मात्र दुसऱ्याने मेहनतीने पिकवलेले देखील अश्या जळक्यांच्या डोळ्यात खुपते, त्यामुळे ते असा विकृतीचा अवलंब करतात. रामनगर येथील देवकाबाई रामदास भगत यांची दोन एकरातील तर बाबुराव अनपट यांची अडीच एकरातील सोयाबीन सुडी १६ ऑक्टोबरच्या रात्री १० च्या सुमारास अज्ञात आगलाव्यांनी पेटवून दिली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी गोळा झाले मात्र आगीचा वणवा एवढा भडकला होता की त्यापुढे कुणाचे काही चालले नाही. कृषीमित्र सचिन बोंद्रे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांनीही घटनास्थळी धाव घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. दरम्यान महसूल प्रशासनातील संबंधितांनी सुडी जळत आहेत जळू द्या सकाळी पंचनामा करू अशी उत्तरे दिल्याचा आरोपी गावकऱ्यांनी केला आहे. दुसऱ्या शेतकऱ्यांची प्रगती डोळ्यात खुपल्याने सुड्या पेटवून देणाऱ्या आगलाव्या विरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी सचिन बोंद्रे आणि कपिल खेडेकर यांनी केली आहे.