कर्ज वसुलीसाठी आलेल्या फायनान्स कर्मचाऱ्याची महिलेला अश्लील शिवीगाळ! महिलेची सिंदखेडराजा पोलिसांत तक्रार..

 
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) कर्ज वसुलीसाठी आलेल्या एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याने महिलेला अश्लील शिवीगाळ केल्याची घटना सिंदखेड राजा येथे घडली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अमोल मनोहर गोलाम (रा. शिवणा खुर्द ता. मूर्तिजापूर जि. अकोला) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिंदखेड राजा येथील एका महिलेने एस. फायनान्स कंपनीकडून कर्ज काढले होते. दरम्यान, मंगळवार, १४ मे रोजी कंपनीचा कर्मचारी अमोल गोलाम हा हप्ता घेण्यासाठी आला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आज माझ्याकडे पैसे नाही, मी नंतर देते. परंतु अमोल याने अश्लील भाषेत बोलायला सुरुवात केली. शिवीगाळ केली तसेच घरातील सामान बाहेर फेकण्याची धमकीही दिली असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.