अखेर शेगावच्या ‘त्या’ रेशन दुकानाचा परवाना निलंबीत! तब्बल पाच महिन्यानंतर पुरवठा विभागाची कारवाई! वाचा काय आहे कारण...

 
Dhany
शेगाव(ज्ञानेश्वर ताकोते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वस्त धान्याच्या दुकानाआडून रेशनच्या तांदळाचा काळाबाजार केल्याच्या कारणावरून शहरातील श्रावण बहुद्देशीय संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा विभागाकडून निलंबीत करण्यात आला आहे. प्रकरण उजेडात आल्यानंतर जवळपास पाच महिन्याच्या विलंबानंतर पुरवठा विभागाकडून सदरची कारवाई करण्यात आली. 

याबाबत सविस्तर असे की, शहरातील दोन मोरी परिसरात शहर पोलिसांच्या डीबी पथकाने १५ सप्टेंबर २०२२ रोजी रेशनचा अंदाजे ३० क्विंटल तांदुळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असलेले वाहन रस्त्यावर पकडले. त्या वाहनात ६० कट्टे तांदूळ मिळून आला. तेव्हा वाहनचालक मो.इकबाल मो.इस्माईल वय २५ रा.बाळापूर याची पोलिसांनी चौकशी केली असता वाहनातील तांदुळ दीपक ढमाळ यांच्या गोदामातून आणला असून, तो अकोला जिल्ह्यातील कसुरा गावात घेऊन जात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

त्यानंतर वाहनामध्ये असलेला ३० क्विंटल तांदुळ रेशनचा आहे का? याबाबत तपासणी करण्यासाठी पोलिसांनी पुरवठा विभागाला पत्र दिले. २१ सप्टेंबर रोजी माहिती मिळाल्यानंतर मो.इक्बालसह दीपक ढमाळ या दोघांविरोधात कलम ३, ७ अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ढमाळ यांच्या स्वस्त धान्य दुकानाची चौकशी नांदुरा येथील पुरवठा निरीक्षकांनी केली. त्यामध्ये मुख्य आरोपी दिपक ढमाळ यांच्या दुकानात अनेक अनियमितता आढळून आल्या. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी दीपक ढमाळ चालवित असलेल्या श्रावण बहुद्देशीय संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबीत करण्यात आल्याचे शेगाव तहसीलचे पुरवठा अधिकारी बोराडे यांनी सांगितले आहे.