बापा बापा... डोक्याला ताप! जुलैच्या ६ दिवसात १८ झाले नं गायब; कुठ गेले आसनं? बातमीत पहा कुणी दिसतय का ओळखीचं...
Jul 6, 2024, 11:08 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातून बेपत्ता होणाऱ्यांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. पावसाळा चालू झाला तरी बेपत्ता होणाऱ्यांचा लोंढा काही थांबायला तयार नाही. चालू जुलै महिन्याच्या पहिल्या ६ दिवसांत जिल्ह्यातून १८ जणांच्या बेपत्ता होण्याची नोंद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात झाली आहे. ही केवळ पोलिसांसाठीच नव्हे तर समाजासाठी देखील देखील चिंतेची बाब आहे.
दरवर्षी साधारणतः तुळशीचे लग्न लागल्यानंतर बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढते.लग्न सराईत हा आकडा उच्चांक गाठतो. बहुतांश प्रकरणात घरच्यांचा प्रेमविवाह करायला विरोध असल्याने मुली किंवा मुले पालकांना सोडून जात असल्याचे चित्र दिसते. बेपत्ता होणारा किंवा होणारी १८ वर्षांपेक्षा अधिक वयाची असेल तर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केल्या जाते. कारण प्रेमविवाहाचे असेल तर पोलिसांना अशा प्रकरणात फारसे काही करता येत नाही. कारण कायद्याच्या दृष्टीने सज्ञान व्यक्तीला जोडीदार निवडण्याचे अधिकार आहेत. दरम्यान काही प्रकरणांत विवाहिता देखील गायब झाल्या आहेत. तर काही घटनांत घरघुती वादातून घर सोडून जाण्याच्या घटना घडतात.
अल्पवयीन असेल तर मात्र खैर नाही...
काही प्रकरणात अल्पवयीन म्हणजेच १८ वर्षाखालील मुलींना सुद्धा फुस लावून पळवून नेण्याच्या घटना घडतात. अशी प्रकरणे मात्र पोलीस गांभीर्याने घेतात. अशा प्रकरणात पळवून नेणारी व्यक्ती प्रियकर असली तरी अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो, आणि पोलीस तातडीने शोध घेतात. अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणांत नंतर बाल लैंगीक अत्याचाराचा देखील गुन्हा दाखल झाल्याची उदाहरणे आहेत.
कोण कोण झाले बेपत्ता?
जिल्ह्यात १ जुलै ते ६ जुलै या कालावधीत १८ जण बेपत्ता झाले आहेत. यात १८ मुली/ महिलांचा समावेश आहे. १ जुलैला आलिया अजमी आलम खान ही १८ वर्षीय तरुणी जळगाव जामोद येथून बेपत्ता झाली.शेजल संतोष कल्याणकर (२२) ही बावणबीर येथून,प्रतीक्षा संदेश ससाने(१९) वरवट बकाल येथून, योगिता हरिदास घटीये(१९) पाळा येथून, श्वेता राजेश बनसोड (२३) जळगाव जामोद तालुक्यातील वाडी खुर्द येथून, तन्वी जयेश दसानी(२३) खामगाव, सौ. छाया रामसिंग डाबेराव (३८) शेगाव तालुक्यातील येऊलखेड, सौ.रेखा किशोर शेजुळ (२७) लोणार तालुक्यातील गुंधा येथून, ऐश्वर्या प्रमोद धोरण (१९) बुलढाणा येथील पंकज लध्दड कॉलेजमधून, सौ. कल्पना संतोष तनपुरे (२०) लोणार तालुक्यातील टिटवी येथून, मिलन नंदकिशोर गवई ही २६ वर्षीय विवाहिता बुलढाणातील विष्णूवाडी येथून स्वतःच्या मुलाला घेऊन गायब झाली आहे. सौ.शीतल श्रीहरी खवले (२८) तायडे कॉलनी खामगाव येथून, अफसाना शेख कदीर (२७)गुलशन नगर मेहकर येथून तर रेशमा बी शेख इब्राहिम डोणगाव येथून बेपत्ता झाली आहे.
या चौघांचा पत्ता नाही..
गत ६ दिवसांत जिल्ह्यातून ४ पुरुष देखील बेपत्ता झाले आहेत. डोणगाव येथून अंकित राजू जाधव (२३) हा तरुण गायब आहे . बुलढाणा शहरातील इकबाल नगरातून तौसीफ कयामूद्दीन खान (२८), चिखली तालुक्यातील सेल्सूर येथून नारायण भगवान गंडे तर मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथून शुभम राजेंद्र जटाळे (३० ) हा बेपत्ता आहे.